Sunday, December 18, 2011

अण्णांच्या जनआंदोलनाने हादरले सरकार


अण्णा हजारे यांच्या भ्रष्ट्राचारविरोधी जनआंदोलनास मिळालेले व्यापक जनसमर्थन ही २०११ मधील ठळक घटना होय. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाने भारतीय समाजकारण व राजकारणात प्रचंड उपलथापालथ घडवूण आणली. या मुद्यावर संपूर्ण देश एकजूट झाला आणि जनभावनेच्या रेट्याने केंद्र सरकारला हादरून टाकले. देशवाशीयांसंबंधीत निर्णयात लोकविर्वाचित सरकारला जनतेला सहभागी करून घ्यावे लागेल. जनप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असून त्यांना जनहिताचेच निर्णय घ्यावे लागतील. घटनेनुसार संसद सर्वश्रेष्ठ असून कायदे बनवण्याचा अधिकार संसदेलाच आहे, यात दुमत नाही. मात्र लोकनिर्वाचित सरकारला संसदेत जनहिताचा अनादर करणारे कायदे बनवता येणार नाही, हे या आंदोलनाने रोखठोक बजावले. संसद ही नैतिकदृष्ट्या नागरिकांना जबाबदार आहे, हे ठसवून जनप्रतिनि व सरकारला कर्तव्याची आठवून करून देण्याचे काम या लोकलढ्याने केले. लोकशाही ही लोकांनी, लोकांची, लोकांसाठी चालवलेली व्यवस्था असून निर्वाचित सरकारला हुकुमशाहीकडे झुकता येणार नाही, अनिर्बंधपणे सत्ता उपभोगून जनतेचे हित दुलर्क्षिता येणार नाही, हे या लढ्याने राजकारण्यांचा ठणकावून सांगितले.

सरकारने मजबूत लोकपाल विधेयक आणावे यासाठी गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना एप्रिलमध्ये राजधानीत १३ दिवसांचे उपोषण करावे लागले. या अहिंसात्मक आंदोलनाची दखल जगभरात घेतल्या गेली. जगभरात त्याचे पडसाद उमटले. जगभरात पसरलेल्या भारतीयांनी या जनलढ्याच्या समर्थनार्थ धरणे धरली. गावापासून जागतिक पातळीपर्यंत जनाधार मिळालेले स्वातंत्र्यलढ्यानंतरचे हे पहिले आंदोलन असणार. जगभरातील प्रसारमाध्यमात या लढ्याचे पडसाद उमटले. ख्यातनाम आंतरराष्ट्रीय 'टाइम्स मॅगझिन'ने जगातील प्रमुख दहा घटनांमध्ये या जनआंदोलनास स्थान देवून जनलढ्यास ‍प्राप्त व्यापक जनसमर्थन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील व्यवस्थेप्रती नागरिकांमधील वाढता निराशावाद आणि आकांक्षेचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.

व्यापक जनसमर्थनाचे कारण
सामान्य व्यक्तिस हजार समस्यांतून तोंड वर काढायला वेळ नसताना समर्थनार्थ रस्त्यांवर जनसागर उतरण्याचे कारण केंद्र सरकारमधील मंत्री आणि नेत्यांचे एकापाठोपाठ उघडकीस आलेले कोट्यावधींचे घोटाळे आणि सामान्यजणांच्या आवाक्याबाहेर गेलेली महागाई होय. 'कॉमनवेल्थ' घोटाळ्यानंतर '२-जी स्पेक्ट्रम' उघडकीस आला आणि जनतेच्या पैशांची लयलूट सुरू असल्याचे स्पष्ट झाले. सरकारला जनतेच्या हिताशी देणेघेणे नसल्याची जनभावना यातून बळकट झाली. सरकार घोटाळे रोखू शकत नाही आणि महागाईही आवाक्यात आणू शकत नसल्याचे सरकार जनकल्याणाप्रती बेजबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. देशाच्या इतिहासात सरकारमधील मंत्री पहिल्यांदाच तिहार तुरूंगात गेले असणार. या अराजकसदृष्य वातावरणात जनक्षोभ खद्खदत होता. अण्णा आंदोलनाने त्यास व्यासपीठ मिळाले, रस्त्यांवरून घोषणाबाजीतून तो अभिव्यक्त झाला. सशक्त लोकपाल विधेयक आल्यास या कोंडीतून जनसामान्यांची सुटका होईल, अशी आशा यामुळे जागृत झाली. प्रस्थापित व्यवस्था आणि बेबंद सरकारविरूद्धच्या आक्रोशाने त्यास व्यापक जनलढ्याचे स्वरूप प्राप्त झाले.


प्रसारमाध्यमं आणि सोशल वेबसाइट्सची भूमिका
केंद्रातील सत्ताधारी सरकारने अण्णा आंदोलनाची प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेलं 'आभासी जनआंदोलन' म्हणून संभावना केली होती. खासकरून इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी घराघरातील टेलिव्हिजन संचावर सोयिस्कर मजकूर झळकावून आभासी आंदोनलन उभे केल्याचा त्यांचा होरा होता. मात्र अण्णांची उपोषणास्त्र उगारल्यानंतर हे फक्त अण्णांचे आंदोलन न राहता त्याने जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले. अण्णा फक्त त्याचा एक चेहरा होते. ते आभासी नसून वास्तव होते. सरकारच्या चूक लक्षात आली तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती. जनमत सरकारविरोधात गेले होते. जनतेचा नैतिक पाठिंबा सरकारने कधीच गमावला होता. प्रचंड जनरेट्यासमोर सरकारला अक्षरश: गुडघे टेकावे लागले आणि लोकमताचा विजय झाला. जगातील सर्वात मोठी लोकशाही परिपक्व झाल्याचे यातून सिद्ध झाले. जिवंत लोकशाहीचे हे लक्षण आहे.

२०११ हे जगभरात जनक्रांतीचे वर्ष ठरले. जागतिक इतिहासात या वर्षाची जनआंदोलन आणि जनक्रांतीसाठी सुवर्णक्षरात नोंद होईल. शोशल वेबसाइट्सने यात अनन्यसाधारण भूमिका बजावली. जनआंदोलन आणि सोशल माध्यमं एकमेकांची पूरक ठरल्याचे आपण बघितले. सोशल वेबसाइट्स, ब्लॉग्स आणि एसएमएसच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात विचार, माहिती आणि संदेशांची देवाणघेवाण झाल्याने सुप्तपणे जनआंदोलनाची बीजे पेरल्या गेली. लोकशाहीत, हुकुमशाही किंवा कोणत्याच व्यवस्थेत सार्वजनिकरित्या जनजागृती, जनमंथनाचे मार्गात सरकारांनी अवरोध निर्माण केल्याने हे काम सोशल माध्यमातून होत आहे. अरब क्रांतीतही या माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अक्ष:रशा सरकारं उलथून टाकली आणि जनक्रांतीचे, जनआंदोलनाचे नवीनम माध्यम उदयास आले. म्हणूनच भारत सरकारने या माध्यमांचा धसका घेऊन प्रथम बल्क एसएमएसवर नियंत्रण आणल्यानंतर आता फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल वेबसाइट्सवर मजकूर प्रकाशनाबाबत नियंत्रण आणण्याची भाषा बोलत आहे. मात्र सरकारचे हे धोरण हुकुमशाही व दपडशाहीकडे झुकणारे असून लोकशाही व्यवस्थेत सरकारला अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर असली बंधने घालता येणार नाही. सरकारने नकारात्मक दृष्टिकोण सोडून जनआंदोलन, जनजागृती हे सशक्त आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण मानून या बदलांचे स्वागत करायला पाहिजे.

Saturday, December 17, 2011

विद्या बालन सर्वकष अभिनेत्री म्हणून स्थापित


विद्या बालन बोल्ड चित्रपटही करू शकते, कोणतीही भूमिका तितक्याच सक्षमपणे निभावू शकते आणि स्वतः:च्या भरवशावर चित्रपट हिट करू शकते, हे २०११ मध्ये सिद्ध झाले. 'डर्टी पिक्चर'ने तिकीट खिडकीवर अक्षरशः धूम घातली. समीक्षकांनी विद्याच्या भूमिकेची मुक्तकंठाने केली आणि विद्या सर्वकष अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमध्ये प्रस्थापित झाली ते २०११ मध्येच.

विद्या बालनने या चित्रपटात ९० च्या दशकातील बिनधास्त दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्कची बोल्ड भूमिका साकारली आहे. स्वोज्वळ, शालीन नायिकांच्या भूमिकात रंग भरणारी विद्या बोल्ड भूमिकेस न्याय देऊ शकेल काय, याबाबत क्षेत्रातील जाणकारांमध्ये साशंकता होती. कारण विद्याचे व्यक्तिमत्व या भूमिकेच्या अगदी विपरित आहे. तिचा चेहरा, डोळे, हावभाव, मृदू वाणी आणि एकंदर देहबोलीतील नाजूकता सर्वपरिचित आहे.याउलट मादकता, बेहोशी, बिनधास्तपणा हा सिल्क स्मिताचा स्थायिभाव. ही भूमिका साकारणे विद्यासाठी एक आव्हान होते. विद्याने अभिनयाप्रती समर्पित भाव आणि उपजत अभिनयक्षमतेच्या भरवशावर हे आवाहन अक्षरशः पेलत सर्वांना आवाक् केले.

बादल सरकार यांच्या 'परिणिता' चित्रपटातून विद्या पहिल्यांदा चित्रपटसृष्टित झळकली. यामध्येही तिची मध्यवर्ती भूमिका होती. या चित्रपटातील सशक्त अभिनयाने विद्याने लक्ष वेधून दखल घेण्यास भाग पाडले. विद्याचे दमदार आगमन झाले. मात्र वयाच्या दृष्टिने थोडे उशिरा आगमन झाल्याने तिच्याकडे कॉलेज तरूणीच्या भूमिका आल्या नाहीत. दमदार कथानकात चांगला अभिनय करणार्‍या अभिनेत्रीच्या साच्यातच ती राहिली. तिला चांगल्या दिग्दर्शकांनी संधी दिली मात्र आपल्याकडे नायिकाप्रधान चित्रपट विशेष निघत नसल्याने तिच्या अभिनयक्षमतेस विशेष वाव मिळत नव्हता. दरम्यान काही लहानमोठ्या व्यावसायिक चित्रपटांमधून ती झळकली.

कलाक्षेत्रात प्रतिभा व्यर्थ जात नाही हे नक्की. मणिरत्मन यांनी 'गुरू' चित्रपटात फिजिकली चॅलेंज्ड तरूणीची आव्हानात्मक भूमिकेसाठी तिची निवड केली. विद्याने व्हिलचेअरवर वावरणार्‍या तरूणीची भूमिका असी काही साकारली की ती खरोखरच त्या आजाराने ग्रस्त आहे. त्या भूमिकेतील तरूणीच्या इच्छा, आकांक्षा, प्रेम, चिड, असहाय्यता आणि जीवनाचा आनंद घेत जगण्याची दृढ इच्छांना तीने चेहर्‍यावरील हावभावातून अक्षरशः जीवंत केले. यानंतर 'पा' चित्रपटातून तीने फिजीकली चॅलेंज्ड मुलाच्या आईची भूमिका साकारली की ती त्या मुलाची खरोखरची आई भासली. विद्या भूमिकेत शिरून व्यक्तिरेखेशी एकरूप झाल्याने तिचा अभिनय सहज, सुंदर व नैसर्गिक वाटतो. पडद्यावर ती स्टार विद्या न वाटता व्यक्तिरेखेत वावरत असते.

विद्याने पहिल्यांदा बोल्ड व्यक्तिरेखा साकारली ती 'इश्किया' चित्रपटातून. संपर्कात आलेल्या पुरूषांना मोहात फासणार्‍या विधवा स्त्रिची भूमिका तीने यामधून साकारली होती. विद्याच्या या चित्रपटातील भूमिकेने तिकीट खिडकी गाजवली. समीक्षक आणि प्रेक्षकांना विद्या सशक्त अभिनय चांगलाच भावला. माउथ पल्बिसिटीने हा चित्रपट अनपेक्षितरित्या हिट झाला. यामध्ये तीने चुंबनदृष्यही केली होती.

मात्र आपली मादकता, बिनधास्तपणा आणि बोल्डपणामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत गाजवणारी, कंटेटच्या दृष्टिने दुय्यम चित्रपटा काम करून स्टारपद प्राप्त झालेल्या सिल्क स्मिताची भूमिका साकारणे धाडसी पाऊल होते. कारण या दशकात पडद्यावर तिची विश्वासार्हता भासवणे खडतर आव्हान होते. विद्याने ते धाडस केले. अभिनयक्षमतेस आव्हान देणार्‍या भूमिका साकारणे, प्रयोग करणे हीच एका सशक्त कलाकाराची कसोटी असते. विद्याने या सर्व कसोट्या पार पाडल्या आहेत. विद्या रॉक्स... उह्ह लाला...!

देव आनंद: जीवनतत्वज्ञानाची पाठशाळाचार दशकं रूपेरी पडद्याला सोनेरी कडा देणार्‍या सदाबहार रोमँटीक सुपरस्टार देव आनंद यांच्या निघून जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील रोमँटीसिझमचा कालखंड संपृष्टात आला. भारतीय मन, अभी ना जाओ छोडके की दिल अभी भरा नही.. गुणगुणत असतानाच त्यांनी २०११ वर्षाच्या अखेर 'एक्झिट' घेतली.

देव साहेबांनी आयुष्यभर जीवनातील प्रत्येक क्षण आनंदात जगण्याचे तत्वज्ञान आपल्या जीवनशैलीतून घालून दिले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. जीवन हे अमुल्य असून प्रत्येक क्षण मौल्यवान असल्याने त्याचा सकारात्मक कंस्ट्रक्टीव्ह कामासाठी उपयोग करण्याचा धडा त्यांनी दिला. मोहमयी दुनियेत राहुनही भूतकाळात गुंतून न राहता वर्तमानात सतत नवनवीन प्रयोग करताना भविष्यकाळास आकार देत राहिले. देव साहेबांनी हिंदी चित्रपटसृष्टीला स्टायलीश, सळसळत्या तारूण्याचा वरदहस्त लाभलेला सकारात्मक नायक देऊन रूपेरी पडद्यास वार्धक्याची छाया पररण्यापासून वाचवले.

दिलीप-देव-राज ही हिंदी चित्रपटसृष्टीस प्राप्त झालेली तीन रत्न होतं. त्यांनी अमूर्त छाप सोडताना कलात्मक माध्यमाच्या हाताळणीचे नवनवे प्रयोग करून एक कालखंड घडवला. तिघांनीही अभिनयाच्या भिन्न शैली प्रस्थापित केल्या. दिलीप साहेबांनी ट्रॅडेजी किंग रंगवला, राज कपूरने साळा-भोळा नायक प्रस्थापित केला तर देवने स्मार्ट, स्टायलीश नायक या चित्रपटसृष्टीस बहाल केला. देव आनंद निराशावादी भूमिकांपासून नेहमी दूर राहिले. गाता रहे मेरा दिल...म्हणत त्यांनी सकारात्मक जगताना जीवनास नवीन दृष्टी देणार्‍या भूमिकाच साकारल्या आणि प्रत्यक्ष जीवनातही त्यांनी हेच तत्वज्ञान पाळले. अमृत प्राप्त झालेल्या या नायकाच्या चेहर्‍यावर कधी सुरकत्या पडलेल्या प्रेक्षकांनी पाहिल्या नाहीत. ते भरभरून जीवनरस प्यायले आणि भारतीयांसाठीही त्याचे कुंड भरून ठेवले. त्यांनी प्रेक्षकांना पर्याय दिले आणि निवडीचा निर्णय दर्शकांवर सोडून दिला.

स्वत:च्या जीवनतत्वज्ञानावर त्यांचा अढळ विश्वास होता आणि तो ८८ वर्षाच्या जीवनप्रवासात कधीही ढळला नाही. वाटेत कित्येक वळणं आली असतील मात्र त्यांची वाट चुकली नाही. हेतुपरस्पर दुर्लक्ष करत तो चालत राहिला. जीवनप्रवास हा अखंड चालणारा कालप्रवाह असून तो कधीही थांबत नाही, तो अखंडीत आहे, हेत त्याने सांगितले. आपणास प्राप्त झालेले जीवन खूप छोटे असून ते व्यर्थ घालवणे इष्ट नाही.

सतत चालत राहून, व्यग्र राहून, प्रत्येक क्षणाचा सवौच्च उपयोग घ्यायचा, प्रत्येक क्षण अनुभवायचा, हेच त्यांनी सांगितले. हे जग, ही मोहमयी दुनिया, कारकीर्दीतले महान चित्रपट हे खूप सुंदर आहे मात्र मला येथेच थांबता येणार नाही, याहीपलीकडे आणखी खूप काही आहे, त्याचा शोध मला घ्यायचा आहे. जीवनाला दिलेलं वचनं मला निभवायच आहे,मला शेवटचा श्वास घेण्याअगोदर खूप दूर जायचे आहे, हेच देव साहेबांनी प्रत्येक गोष्टीतून सांगितले. रॉबर्ट फ्रॉस्टने आपल्या कवीतेतून हे तत्वज्ञान सहज, सुंदर ओळीतून शब्दबद्ध केले आहे...

The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.

Monday, November 21, 2011

उमेश यादव: भारतीय आक्रमणाची तेजतर्रार धार


कोळसा खाणकामगाराचा मुलगा भारताचा प्रमुख क्रिकेटपटू होऊ शकतो काय....?.. शाळामास्तरचा मुलगा देशातील प्रमुख उद्योगपती होऊ शकतो काय, शेतकर्‍याचा मुलगा पंतप्रधान होऊन देश चालवू शकतो काय....?

आजही गुलामगिरीचा पगडा असलेल्या सामान्य भारतीय मनासाठी हे स्वप्नवत आहे. आपल्यासारखा गरीब, सामान्य व्यक्ति इतके महान कार्य करण्यास सक्षम आहोत काय याबाबत त्यांच्या मनात साशंकताच असते. धनाढ्य,गर्भश्रीमंत, उच्चशिक्षित, प्रशासन, सत्ताकारणात वरिष्ठ पदावर असलेली माणसंच ही महान कामं पेलु शकतात, असा एक भाबडा समज त्याच्या मानसिकतेत रूजलेला असतो. शुन्य आत्मविश्वास आणि क्षमतांची, कौशल्याची जाण नसलेले सामान्यमण त्या मानसिकतेच्या वलयातच गुरफलेलं असते. मात्र शतकानुशतके समाजमणाच्या मानगुटीवर बसलेल्या या मानसिकतेस नाकारून स्वत:तील क्षमता, कौशल्य, जीद्द, आणि मेहनतीच्या जोरावर कुणीही काहीही करू शकतो, बनू शकतो हे अनेकांनी दाखवून दिले आहे. भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव हा त्यातलाच एक.

कोलकात्यात वेगवान मार्‍याने विंडीज संघाची दाणादाण उडवणार्‍या उमेशने तमाम तरूणाईच्या आशा पल्लवित केल्या आहेत. मनगटात दम आणि डोक्यात विचार असल्यास कोणताच अडथळा, कमतरता तुमचा मार्ग रोखू शकत नाही, हा आत्मविश्वास त्याला जागवला आहे. महाराष्ट्र राज्यातील तथाकथीत मागास समजल्या जाणार्‍या विदर्भात चंद्रपुर जिल्हा आहे. येथील माजरी हे त्याचे गांव. वडिल येथील कोळसा खाणीत काम करतात. विदर्भातील आंध्र प्रदेशला लागून असलेल्या भागात कोळसा खाणी आहेत. या भागात औष्णिक विजनिर्मिती प्रकल्पही असून राज्याला ‍बहुतांश विद्युतपुरवठा येथूनच होतो. हा भाग खनिज संपत्तीने समृद्ध असण्यासोबतच वनश्रीने नटलेला आहे. म्हणूनच राज्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असल्यानंतरही तो तथाकथित मागास आहे, हे न समजणारे कोडे. मात्र या उपेक्षित परिस्थितीवर मात करून तो भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला आहे, ही त्याची अचिव्हमेंट आहे.

उमेशचे बालपण येथील राकट देशा...कणखर देशश... दगडांच्या देशातंच गेले. सर्वात दूर कोळसा कोण फेकतो म्हणून मित्रांसोबत त्याच्या पैजा लागायच्या आणि अंगकाठीने दांडगा, राकट, उंचपुरा असलेला उमेशच नेहमी पैजा मारायचा. गरीब कुटुंबात कोळसा खाणीच्या प्रदेशात बालपण गेले. भाकरी खाऊन मिंत्रासोबत खेळणं आणि परिस्थितीनुसार पडलेली कामं करत शरीर चांगल कसल्या गेलं. आपण क्रिकेटपटू बनून देशाकडून खेळू हे त्याने स्वप्नातही पाहिले नव्हते. पोलिसात भरती व्हायचे इतकेच काय ते त्याच्या मनाने घेतले होते. त्यासाठी शरीर बलदंड व्हावे म्हणून शारीरिक कसरत, धावण्याचा व्यायाम हा त्याच्या दिनक्रम बनला होता.

वजनी कोळसे फेकता फेकता उमेश बंदुकीच्या गोळीसारखा चेंड़ फेकु लागला आणि बघताबघता वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपास आला. २००८ साली नोव्हेंबर महिन्यात त्याने रणजी पर्दापण केले. वेगवान गोलंदाजांची वाणवा असलेल्या आपल्या देशात सारखा १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणार्‍या उमेशने अवघ्या दोन वर्षात राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले
आणि २०११ मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून आयपीएल स्पर्धेत खेळला. यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या एमर्जिंग प्लेअर्स स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करून आपण आंतरराष्ट्रीय स्तराचे मटेरियल असल्याचे सिद्ध केल्याबरोबर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली आणि त्याने दिल्लीत पहिल्या कसोटीतच आपली छाप सोडली. कोलकाता कसोटीत तर उमेशच्या गोलंदाजीत चांगलीच धार जाणवली. त्याच्या गोलंदाजीत सामण्यागणीक झपाट्याने सुधारणा होत आहे. सातत्याने १४० पेक्षा जास्त वेगावे मारा करण्यासोबतच चेंडू जुना झाला म्हणजे रिव्हर्स स्विंग करण्यात त्याचा हातखंडा आहे. आतापर्यंत भारतीय संघास सतावणारे प्रतिस्पर्धी फलंदाजीचे शेपटाची वळवळ थांबवली ती उमेशनेच.
१४५ च्या वेगाने भेदक मारा करून तो अवघ्या ५ मिनिटात शेपूट गुंडाळून डांव संपृष्टात आणतो. कोलकाता कसोटीत त्याने घेतलेल्या ७ बळींपैकी ५ जणांचा त्याने त्रिफळा उद्वस्त करताना विंडीजची फलंदाजी अक्ष.रशा कापून काढली होती.

त्याच्या गोलंदाजीचे विश्लेषण 'रॉ स्पेस विथ ब्रेन' असे करता येईल. त्याच्या गोलंदाजीत सुसाट वेगासोबतच अचूकता दिसून येते. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता तो धिरोदात्तपणे गोलंदाजी करतो. त्याच्या चेहर्‍यावर तणावाऐवजी शांत भाव असतात. ही मानसिकता मोठ्या खेळाडूची ओळख आहे. आपणाजवळ क्षमता, कौशल्य तर आहे मात्र कणखर मानसिकता नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर फार काळ टिकणे शक्य नाही. आपात्कालीन परिस्थितीत जो खिंड लढवतो, तोच खरा योद्धा. उमेशने आतापर्यंत २ कसोटीतून ९ बळी घेतले असून आगामी ऑस्ट्रेलिया दौर्‍यात त्याला चांगली संधी आहे. ऑसीजना सळो कि पळो करून सोडण्याची धमक त्याच्यात असून भारतीय संघास दमदार कामगिरी नोंदवण्यात त्याचा महत्तवाचा वाटा असेल. ब्राव्हो उमेश!

Sunday, September 4, 2011

अनिल अवचट


डॉ. अनिल अवचट वास्तववादी लेखक आहेत. वातानुकूलित खोलीत बसून कॉफीचे भुरके मारत विश्लेषण करणार्‍या किवा कल्पनांचे महाल उभारणार्‍या लेखकांपेक्षा डॉ. अवचट यांची जातकुळी जरा वेगळी आहे. कोणतीही समस्या किवा प्रश्नावर लिहिण्या अगोदर ते ती परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवतात.

त्यांच्या लेखनाची शैली व पद्धतच तशी आहे. थोडक्यात रिपोर्ताज पद्धतीचे लेखन त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले. त्यांच्या वेगळ्या नि वास्तववादी शैलीमुळे लोकांना ते आवडलेही. कृतीवर विश्वास ठेवणारया अवचटांचे लेखन अनुभव व कृतीतून उमटते.

त्यामूळेच वाचक जेव्हा अवचटांना वाचतो तो त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. ते वाचकांना वस्तुनिष्ठ व वास्तव अनुभव देतात. अवचटांची लेखनशैली साधी, सरळ व अनलंकृत आहे. अवचटांचा पिंड आहे कार्यकर्त्याचा. समाजसेवकाचा. त्यांनी प्रश्नांना, समस्यांना वरवरून बघितले नाही, तर समस्येच्या थेट मुळाशी पोहचण्याचा त्यांचा आग्रह असतो. डॉ. अवचट यांनी पुण्यात. बी. जे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली.

वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही त्यांच्या चर्चा चालायच्या त्या सामाजिक क्रांती, सुधारणा, जागृती, विकास या विषयांवरच. डॉ अवचटांच्या बी. जे. मधील मित्रांमध्ये डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ जब्बार पटेल यांचा समावेश होता. कलाक्षेत्रात रस असणारे हे त्रिकूट संपूर्ण महाविद्यालयात 'फेमस' होतं. महाविद्यालयातील स्नेहसंमेलने, महोत्सव, आंदोलने हे यांचे प्रांत. तिघांनीही वैद्यकीय पेशा सोडून कला, समाजसेवा, व राजकीय क्षेत्रांत स्वतःला वाहून घेतले.

डॉ. अवचट यांनी डॉक्टरकी सोडून संपूर्ण वेळ समाजसेवा व लेखनाला द्यायचा निर्णय घेतला. या काळात त्यांच्या पत्नीची त्यांना खंबीर साथ लाभली. मादक द्रव्याच्या आहारी गलेले तरूण, आहारी जाण्याची कारणे व आहारी गेल्यानंतर कौटूंबिक, सामाजिक, आर्थिक पातळीवर उभी राहणारी आव्हाने यांचा अभ्यास केला. यातून आलेल्या अस्वस्थतेतून 'गर्द' हे पुस्तक निर्माण झाले. मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या तरूणाईला वाचविण्यासाठी काही तरी करायला पाहिजे या अस्वस्थतेतून 'मुक्तांगण' ही संस्था उभी राहिली.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी मुक्तांगणच्या उभारणीत प्रारंभी हातभार लावला. कोंडमारा, कार्यरत, माणसे, जगण्यातील काही, धागे उभे आडवे ही डॉ. अवचटांची काही पुस्तके. डॉ अवचटांनी 'स्वतविषयी' हे आत्मपर पुस्तक लिहिले आहे.

स्वतःविषयी हा स्वतच्याच उभ्या आडव्या आयुष्याचा वस्तूनिष्ठ वृतांत आहे. डॉ अवचट यांच्यात कलावंत खच्चून भरला आहे. डॉ अवचट उत्तम रेखाटन, चित्रकला, शिल्पकला यासोबतच ओरीगामी कलेत त्यांनी प्राविण्य मिळविलेले आहे. चित्रकला, ओरीगामी हे त्यांचे फावल्या वेळतील छंद आहेत. या छंदांबद्दल त्यांनी 'छंदाविषयी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

भाऊ पाध्ये: मुंबईतील संक्रमणकाळ टिपणारा लेखक


भाऊ पाध्ये हे सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला आहे.
मुंबईसारख्या विविधांगी व मिश्र संस्कृती असलेल्या शहरात संक्रमणकाळात झालेले बदल व त्याचा समाजातील सर्वच स्तरावर विशेषत: तरूण पिढीवर झालेल्या परिणामांना त्यांनी आपल्या लेखनातून अभिव्यक्ती दिली आहे.

भाऊंनी 'वासूनाका, अग्रेसर, राडा' या कादंबर्‍या लिहिल्या. 'राडा' मध्ये उच्चभ्रू कुटूंबातील तरूण, मनाविरूद्ध झालेले निर्णय सहन करू न शकल्याने वाहवत जातो. महानगरीय वातावरणात विविध सामाजिक, राजकीय प्रवाह निर्माण होत असतात व त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम समाजमनावर होत असतो.

अशा परिणामाच्या काही पिढ्या असतात. सत्तरच्या दशकात शिवसेनेने मुंबईत आपला प्रभाव निर्माण करायला सुरवात केली होती. कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर असलेल्या या शहरात कापड गिरण्या व गिरणी कामगार यांची वेगळीच संस्कृती निर्माण झाली होती.

बहुतांश कामगार वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपरर्‍यातून आला होता. शिवसेनेचा अजेंडा मराठी मनाला भुरळ घालणारा होता. त्यामुळे महानगरीय वातावरणात मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाणार्‍या मराठी तरूणांना शिवसेना हे हक्काचे व्यासपीठ मिळाले.

त्यामुळे शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झाला. कामगार संघटनांतून कम्युनिस्टांची हकालपट्टी करून सेनेने मराठी ताकद आपल्या पाठीशी उभी केली. 'राडा' मध्ये ही सारी पार्श्वभूमी येते. किंबहूना या वातावरणातूनच तिची निर्मिती झाली आहे.

पाध्येंनी या बदलांमुळे होणार्‍या परिणामांचे मानसिक विश्लेषण न करता कादंबरीत संवादात्मक व पटकथात्मक, सरळ मांडणी करून विश्लेषण व निर्णयाचे स्वातंत्र्य वाचकांवर सोपविले आहे. त्या काळात ही कादंहबरी वादग्रस्तही ठरली होती.

पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत.

भीमाशंकर: सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातून वन्यजीवदर्शन


भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध येथेच केला होता. यावेळी शंकरास आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंदिराच्या मागे मोक्षकुंड असून घनदाट जंगल आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या येथील जंगलातून फिरताना 'शेकरू' हा खारीसारखा दिसणारा दुर्मिळ प्राणी आपले लक्ष वेधून घेईल. येथील जंगल सदाहरित आहे. पाठीवर सॅक टाकून येथील जंगलातूनभटकंतीचा आनंद अवर्णनीय असतो. पहाटेस दाट झाडीतून सूर्याची किरणे डोकावण्याच्या क्षणी पक्षांच्या कर्णमधुर किलबिलाटात येथील दर्‍याखोर्‍यातून सैर करण्याची अनुभूती विसरणे अशक्यच. पक्षीनिरीक्षक व जिज्ञासू वृत्तीच्या पर्यटकांसाठी हे आदर्श ठिकाण आहे. निसर्गप्रेमींना येथे स्वर्ग भूतलावर अवतरल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही.

सह्याद्रीच्या कड्या-कपार्‍यात पावसाच्या वर्षावास सुरूवात झाल्यानंतर येथील सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. येथून भीमा नदी उगम पावून कर्नाटकात कृष्णा नदीत विलीन पावते. येथील जंगल हिरवाईने नटलेले असून येथे आंबे, जांभूळ, हिरडा, बेहडा, बांबू व औषधी वनस्पतीने समृद्ध आहे. अभयारण्याचे वनक्षेत्र मिश्रित वनश्रीने समृद्ध असल्याने येथे जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो.

पर्यटकांना येथे सृष्टीसौंदर्याचा अभूतपूर्व साक्षात्कार घडतो. साहसी पर्यटक व ट्रेकर्ससाठीही हे नंदनवन आहे. दूरवर पसरलेल्या हिरव्यागार पहाडाच्या रांगांमधून वाहणार्‍या नद्यांचा परिसर पर्यटकांना साद घालतो. याशिवाय हनुमान टँक, नागफणी पॉंईंट येथेही भेट देता येईल. येथून चाळीस किलोमीटरवरील डिंभे डॅम विशेष प्रसिद्ध असून येथे आठवड्याच्या शेवटी येथे पर्ययकांच्या गर्दी करतात. वर्षातील काही महिने सोडले तर तिन्ही ऋतूत येथे आनंद घेता येते. पर्यटन महामंडळाने येथे निवासाची व्यवस्था केली आहे. टेहळणी मनोर्‍यांहून येथील वन्यजीव निरीक्षणाचाही आनंद घेता येईल.

पोहचायचे कसे?
विमान, रेल्वे व रस्ते मार्गाने येथे पोहचता येते. विमानाने पोहचायचे झाल्यास सव्वाशे किलोमीटरवर पुणे विमानतळ आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरहून (62 किमी) येथे पोहचता येते.