Monday, August 29, 2011

अण्णांच्या आंदोलनाने कॉंग्रेसमध्ये भूकंप!


कॉंग्रेसचे खासदार प्रवीण ऐरण यांनी अण्णा हजारे मुद्याप्रकरणी पक्षात चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाने अण्णांच्या आंदोलनाचा मुद्दा योग्य प्रकारे हाताळला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींना बदानाम करण्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी हे कारस्थान केले काय, हे बाहेर यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.


लोकपालप्रश्नी अहिंसक आंदोलन करणारे गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे आंदोलन हाताळताना कॉंग्रेस पक्षाने सुरूवातीपासून शेवटपर्यंत घोडचूका केल्याचे तमाम भारतीयांनी पाहिलेच आहे.

यातून या आंदोलनाबाबत पक्षात एकवाक्यता नाही, पक्षात अंतर्गत मतभेद आहेत, हे स्पष्ट होतच होते. सपुआ सरकारने तमाम भारतीयांच्या भावनांचा अनादर करत अण्णांचे जनआंदोलन दपडशाहीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र त्यात यश न आल्यावर सरकारची पिछेहाट सुरू झाली. यातून सरकारसोबतच कॉंग्रेस पक्षाची नाचक्की झाली. याप्रकरणी पक्ष आणि सरकारमध्ये कधीच एकवाक्यता दिसली नाही.

अण्णांनी उपोषण सोडावे यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत प्रस्ताव मांडून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यास सर्वपक्षीय समर्थन मिळण्यासोबतच संसदेनेही अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र दुसर्‍या दिवशी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आपण 'गेम चेंजर' असल्याचा आभास निर्माण करत लोकपालला घटनात्मक दर्जा असावा, निवडणूक आयोगप्रमाणेच लोकपालही घटनात्मक संस्था असावी, असे वक्तव्य संसदेत करत मुद्यास वेगळेच वळण दिले होते.

यामुळे अण्णांच्या तीन मुद्यांवर संसदेत सहमती निर्माण करण्याच्या प्रयत्नास खीळ बसल्याने अण्णांचे उपोषण सुटण्याऐवजी आणखी पुढे ढकलल्या गेले होते. नंतर प्रकरण शेकणार असल्याचे लक्षात आल्यावर सपुआ सरकारने संसदेत चर्चा करून मुद्यांवर सहमती झाल्याचे सभागृहाचे मत अण्णांना कळवल्यावर तेराव्या दिवशी उपोषण संपले होते. कॉंग्रेसमध्ये अण्णा आंदोलन हाताळण्याबाबत असलेले अंतर्गत मतभेद प्रवीण ऐरन यांच्या मागणीने चव्हाट्यावर आले आहेत.

Sunday, August 28, 2011

वतन मे फिजा बदली, शुरूवात नये दौर की..


भ्रष्ट्राचाराविरूद्ध लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी राजधानीत इंडिया गेटवर जनसागर लोटला आहे. 'मै भी अण्णा तु भी अण्णा, अब तो सारा देश है अण्णा' चे नारे देत लोक जनआंदोलनाचा विजय साजरा करत आहेत.

संध्याकाळनंतर येथे जवळपास २५ हजार लोक जमा झाले असून जल्लोषाच्या वातावरणाने परिसर निनादून गेला आहे. लोकशाहीत जनभावना लक्षात घेऊन कायदे बनवले गेले पाहिजे, जनभावनेचा आदर देशकारभार हाकताना राज्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे, लोकशाहीत जनताच सर्वश्रेष्ठ असली पाहिजे, यासाठी जनजागृती आवश्यक असते. हे जीवंत लोकशाहीचे उदाहरण आहे. असल्या अहिंसात्मक जनजागृती करणार्‍या आंदोलनानेच खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक प्रस्थापित होईल आणि लोकशाही अधिक सुदृढ व प्रगल्भ होईल.

अशा तमाम भारतीयांच्या भावना, इच्छा आणि आकांक्षा होत्या, आहेत आणि राहिल. मात्र राज्यकर्ते राजधर्म विसरले म्हणजे लोकशाहीचा गळा घोटल्या जातो, अराजक व अनागोंदीकडे राष्ट्राची वाटचाल सुरू होते आणि जनतेचा हुंकार दडपण्यासाठी दमन, दडपशाही आणि हुकुमशाहीकडे झुकणारी राजवट घट्ट करण्यासाठी शासनकर्त्यांचे हात सरसावतात. भ्रष्ट्राचार सार्वत्रिक होतो आणि लोकांचे हुंकार दडपले जातात. याविरूद्ध देशवासियांच्या मनात असंतोष खदखदत असतो फक्त त्याला असंतोषास दिशा देणारे नेतृत्व आणि व्यासपीठ हवे असते. अण्णांच्या आंदोलनाने ते मिळाले आणि सारा देश रस्त्यावर उतरला आणि त्यानंतर काय झाले ते आपण पाहतच आहोत....

अण्णागिरीने राष्ट्रात नवचैतन्य संचारले असून त्याचेच प्रत्यंतर दिल्ली, मुंबई आणि सार्‍या देशभर निघालेल्या विजय यात्रांमधून येत आहे. देशभर हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या लाखोंच्या जनांच्या प्रवाहातून आता 'नया दौर'ची सुरूवात झाल्याचेच हे घोतक आहे.

Tuesday, August 16, 2011

भारत आणि 'नंबर एक' मधील अंतर संपवण्यासाठी!

विदेशातील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजी ढेपाळते हा इतिहास आहे. भारतात प्रामुख्याने पाटा खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सराव असल्याने हे घडते. त्यातच लीग क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे तरूण क्रिकेटपटू झटपट क्रिकेटमधून मिळणारी प्रसिद्धी आणि पैशाच्या चक्रात अडकतात. झटपट क्रिकेटमुळे कसोटीसाठी लागणार्‍या तंत्रशुद्धतेत तरूण क्रिकेटपटू पिछाडतात. वेस्ट इंडीजमध्ये वरिष्ठ खेळाडूंच्या अनु‍पस्थितीत हे प्रकर्षाने जाणवले. उद्या कसोटी संघात दावा सांगणारे आपले तरूण क्रिकेटपटू विंडीजसारख्या कमकुवत संघाविरूद्ध एकाही डावांत ३०० धावांचा पल्ला गाठू शकले नाहीत. आणि इंग्लंड दौर्‍यातही वरिष्ठ फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर तरूण खेळाडू खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. त्यांच्याकडे स्विंग होणार्‍या खेळपट्ट्यांवर उसळते चेंडू खेळण्याचे तंत्रच नाही. आणि कसोटीत खेळण्याची कणखर मानसिकताही नाही.

कसोटीत फलंदाजांची खर्‍या अर्थाने 'कसोटी' लागत असते. फलंदाजाचे तंत्र, क्षमता, कौशल्य, आणि प्रदिर्घ खेळी करण्याची मानसिकतेचा कसोटीतच कस लागत असतो. इंग्लंड दौर्‍यात विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर या नियमित सलामी फलंदाजांच्या अनुपस्थितीत द्रविडला सलामीस आणि लक्ष्मनला तिसर्‍या क्रमांकावर खेळावे लागले. परिणामी नवीन स्विंग होणार्‍या मार्‍यात त्यांचा नाहक बळी गेल्याने संघातील तरूण खेळाडूंवर मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी पडली. मात्र, ते भारतासाठी धावा करू शकले नाहीत, प्रतिस्पर्धी संघाने उसळत्या मार्‍याचे आक्रमन केल्याबरोबर त्यांनी शस्त्र खाली टाकून रणांगणातून पाय काढला.

या तरूण क्रिकेटपटूंची टी-२० क्रिकेटमध्ये कामगिरी दृष्ट लागण्याजोगी आहे. देशाअंतर्गत मर्यादित षट्कांच्या सामन्यातही त्यांची कामगिरी आश्वासक वाटते. म्हणूनच त्यांच्याकडे द्रविड, सचिन, लक्ष्मनला पर्याय म्हणून बघण्यात येत आहे. मात्र, त्यांच्यात कसोटी संघात राहण्याचीही कुवत नसल्याचे इंग्लंड दौर्‍यात सिद्ध झाले आहे. भारताकडे सद्यातरी सचिन, द्रविड, लक्ष्मन या त्रिकुटाची जागा घेण्याची क्षमता असलेले फलंदाज नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे भविष्य काय असेल हे सांगणे कठिण आहे. भारताचे टेस्ट साम्राज्य आत्ताच खालसा व्हायच्या उंबरठ्यावर असताना भविष्यात आपण कसोटी क्रिकेटमध्ये कोठे असू हे काळच ठरवेल.

लीग किंवा टी-२० क्रिकेटची लोकप्रियता, आर्थिक उलाढाल आणि मनोरंजन मुल्यं मोठे आहे. यामधून तरूण प्रतिभावान क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळण्यासोबतच चांगला पैसा व प्रसिद्धीही मिळत आहे. हे लक्षात घेता 'झटपट' प्रकाराला दोष देणे योग्य नाही. तर नव्या दमाच्या, उमद्या क्रिकेटपटूंनी स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्यासोबतच आपल्या प्राथमिकता ठरवणे आवश्यक आहे. मला फक्त झटपट क्रिकेट खेळून पैसा कमवायचा आहे की प्रदिर्घ काळासाठी देशासाठी खेळायचे आहे, देशाकडून महत्त्वाच्या दौर्‍यात कसोटी क्रिकेट खेळायचे असल्याने त्याअगोदर विश्रांती घेऊन तंदुरूस्त रहायचे कि 'झटपट' क्रिकेट खेळून दुखापतग्रस्त व्हायचे, हा निर्णय खेळाडूंनीच घ्यायचा आहे.

या तरूण खेळाडूंना देशाकडून कसोटी क्रिकेट खेळायचे असल्यास त्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन या प्रकाररासाठी लागणारे फलंदाजी तंत्र विकसित करावे लागेल. यामध्ये सुरूवातीला वेळ द्यावा लागेल मात्र एकदा हे तंत्र विकसित झाल्यानंतर त्यांना 'तिन्ही' प्रकारात खेळायला अडचण जाणार नाही. वेळ व आवश्यकतेनुसार थोडाफार बदल करून ते तिन्ही प्रकारात (टेस्ट, वनडे आणि टी-२०) स्वत:स सिद्ध करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहतील. आणि भारतावर सद्या इंग्लंडमध्ये ओढवलेली नामुष्की पत्करण्याची वेळ येणार नाही.

संघव्यवस्थापनासही क्रिकेटच्या उज्वल भविष्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. संघातील प्रमुख वरिष्ठ फलंदाज किंवा गोलंदाज दुखापतग्रस्त असल्यास त्यांचेजागी खेळण्यास सक्षम दुसरी फळी निर्माण करण्याचे आव्हान त्यांनी स्विकारायला पाहिजे. यासांठी दौर्‍यावर निवड झालेल्या प्रतिभावान खेळाडूंना संघात स्थान देऊन त्यांच्या प्रतिभेस न्याय द्यावा लागेल. तसेच देशातील गुणवत्तापूर्ण प्रतिभा शोधून देशाअंतर्गत मालिका आणि दौर्‍यांमध्ये त्यांना संधी देऊन मजबूत 'दुसरी फळी' उभारावी लागेल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे करू शकते तर आपण का नाही? ऑस्ट्रेलियन क्रिकेट सद्या याच प्रक्रियेतून जात असून त्यांनी दुसरी फळी उभारण्यासाठी धोरणात्मक धाडसी निर्णय घेऊन निकराचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र भारतात निवडकर्त्यांनी आणि नंतर संघव्यवस्थापन व कर्णधाराची मर्जी यातच ही प्रक्रिया अडकली आहे.

भारतातील क्रिकेट प्रशासन अर्थातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळही परदेशातील भारताच्या निराशाजनक कामगिरीस जबाबदार आहे. भारताने ऐंशीच्या दशकातच विश्वविजेतेपद पटकावून जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:स स्थापित केल्यानंतर आणि परदेशात कसोटी मालिका विजय संपादन केल्यानंतर भारतीय क्रिकेट प्रशासनाने भविष्यकालीन वाटचाल लक्षात घेऊन धोरणात्मक आणि धाडसी निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती ओढवली नसती. भारतीय संघ कोणत्याही भूमीवर कोणत्याही संघास धुळ चारण्यास सक्षम राहिला असता आणि खर्‍या अर्थाने टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर एकचा संघ म्हणून आज भारतास मिरवता आले असते. कारण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेस त्यांच्या देशात जाऊन पराभूत केल्याशिवाय भारत खर्‍या अर्थाने नंबर एकचा संघ ठरणार नाही.

यासांठी क्रिकेट प्रशासनास देशभरात वेगवान खेळपट्ट्या बनवाव्या लागतील. यामुळे आपणास दोन-तीन वर्ष नुकसान होईल, मा‍त्र आपली समस्या कायमची सुटेल. रणजी क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी देशात वेगवान खेळपट्टया उपलब्ध केल्यास देशातील नवीन, तरूण प्रतिभा या खेळपट्ट्यांवर तयार होईल आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कोठेच कमी पडणार नाही. भारत खर्‍या अर्थाने सर्वच ठिकाणी वाघासारखा खेळेल, त्यांना शेळ्या बनून खेळावे लागणार नाही. आणि सद्या इंग्लंडमधील संघाच्या कामगिरीने मान झुकली तशी वेळ तमाम भारतीयांवर येणार नाही!

Sunday, May 2, 2010

येवा सिंधुदूर्गात स्वागत असा

क्षितिजापर्यंत परसलेल्या निळ्याशार समुद्राच्या सानिध्यात चंदेरी वाळूच्या किनार्‍यावर मुक्तपणे हिंडताना कोळी बांधवांचा जाळे फैलावण्याचा खटाटोप चाललेला... मासेमारीसाठी पारंपारिक बोटी समुद्रात ढकलल्या जाताहेत... मनाच्या कप्प्यात कोठेतरी जपलेल्या या चित्राची वास्तव अनुभूती आली तर? कोकणातील कुठल्याही किनाऱ्यावर हा अनुभव घेता येतो. पण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नितळ किनार्‍यांवरची त्याची अनुभूती काही वेगळीच. एकिकडे हिरवाईने नटलेल्या भूतलास कवेत घेणारा विशाल सह्याद्री तर दुसरीकडे निळ्याशार सौदर्याचा अविष्कार करणारा अरबी समुद्र. यादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश पर्यटकांना सृष्टीसौंदर्याचे अनुपम दर्शन घडवतो.

कोकणातील वेंगुर्ला हा तर स्वप्ना‍तला गाव. मंगेश पाडगावकरांचे जन्मगाव असलेल्या गावातील स्वप्नाळूपणा त्यांच्या कवितांत अवतरला नसता तरच नवल. वेगुर्ल्याला शुभ्र वाळूचा समुद्रकिनारा लाभला आहे. गावाभोवतालच्या टेकड्यांवर नारळ, काजू, आंब्याच्या बागा बहरल्या आहेत. एखाद्या चित्रात फिट्ट बसावे असे हे गाव. विलक्षण निसर्गसौंदर्याच्या कोंदणात वसले आहे. येथील रामेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच नारळाच्या झाडीत लपलेले सुंदर शहर म्हणजे मालवण. दगडी भूप्रदेशात सिंधुदुर्ग व पद्मगड हे दोन जलदुर्ग आहेत. त्यांना जोडणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवणने मिठागरे, चिनी मातीची भांडी व मालवणी खानपानासाठी ख्याती प्राप्त केली आहे.

लांबच-लांब पसरलेले समुद्रकिनारे, आपल्या उंचीने ढगांच्या उरात धडकी भरवणारी नारळाची झाडे, स्वच्छ सुर्यप्रकाशात तब्बल वीस फुटापर्यंयत समुद्राचा तळ दिसेल एवढे नितळ समुद्र सिंधुदुर्गाशिवाय इतरत्र पहायला मिळणे दुरापास्तच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ला तालुक्यात तारकर्ली, शिरोडा, वेळागर, निवाटी हे प्रदुषण व मानवी हस्तक्षेपापासून मुक्त समुद्रकिनारे आहेत. धकाधकीच्या शहरी आयुष्यातून हद्दपार झालेला निसर्ग आपल्याला येथे भेटतो. येथील निवांतपणा कुठल्याशा पवित्र शांततेचीही अनुभूती देतो. मन स्वच्छ झाल्यासारखे वाटते. सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत हातात कॅनव्हास, ब्रश घेवून मुक्तपणे फिरून विधात्याने निर्माण केलेले मनोहारी चित्र आपल्या मनावर उतरवण्याचा प्रयत्न करून बघायचा, तोही येथेच.

येथील समुद्रकिनार्‍यावरील सुर्यास्तावेळचे रंगाची उधळण करणारे दृश्य आयुष्यभर आपणांस आनंद देत राहील. नैसर्गिक सौदर्यासोबतच साहसी पर्यटक व इतिहासप्रेमीनाही सिंधुदूर्ग आवर्जून बोलावतो. सतराव्या शतकात बांधण्यात आलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्गही मालवणपासून जवळच आहे. शत्रूच्या उरात धडकी भरवणारा हा जलदुर्ग आजही अरबी समुद्राच्या लाटांचा सामना करत निकराने उभा आहे. वेंगुर्ल्याहून जवळच शिरोडा हे गाव आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकरांचे हे गाव. येथील समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारताना खेड्याभोवती पसरलेले मिठागरांचे दृश्य म्हणजे जणू पांढरा समुद्र समोर पसरल्यासारखे वाटते.

कोकणात पर्यटनास गेल्यास कोकणी पदार्थाची लज्जत अनुभवल्याशिवाय परतणार्‍याची गणना अरसिकातच होईल. तारकर्लीत खास कोकणी रेस्टॉरंट आहे. दोन-तीन दिवस भटकायचे झाल्यास महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने निवासाची व्यवस्थाही येथे केली आहे.

कसे पोहचाल : तारकर्लीचे मुंबईपासून अंतर आहे साडेपाचशे किलोमीटर. कोकण रेल्वेने येथे पोहचायचे झाल्यास कुडाळ स्टेशन येथून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. शिरोडा बीच वेंगुर्ल्याहून एकोणीस किलोमीटरवर आहे. कोल्हापूरमार्गेही जाता येते. कोल्हापूरहून तारकर्ली साधारणत: दीडशे किलोमीटरवर आहे. पुणे, कोल्हापूऱ, मुंबईहून मालवणसाठी बस आहेत. मालवणहून तार्कालीसाठी गाड्या आहेत. मालवण रत्नागिरीपासून दोनशे किलोमीटरवर आहे.

Friday, April 16, 2010

फ्रॉम द जर्नालिस्ट पर्सनल डायरी

टक.. टक.. टक.. दारावर वर्तमान पत्र टाकणारा मुलगा. सुरेशची साखर झोप अजूनही संपलेली नाही. झोपेतच... वैताग! पोरगं दारावरून हटायला तयार नाही. सुरेश नाराजीनेच बिछान्यातून उठून काय रे.. आ? पोरगं घाबरत, 'साहेब बील पायजे होत! ' सुरेशने पँटच्या खिशातून पैसे काढून बील चुकत केलं. सुरेशने पेपरवर नजर टाकली. पहिल्या पानावरील बातम्या वाचून झाल्यावर थेट शहर पानावर. स्वतःच्या बातमी सोबत लगेच इतर रिर्पोटर्सनी केलेल्या बातमीची तुलना. जनरल बातम्या झाल्यावर मग विशेष बातम्या. झकास!.. महानगरपालिकेतील सुरशने काढलेली जमीन घोटाळ्याची बातमी पहिल्या पानावर. तेही फक्त आपल्याच वर्तमानपत्रात.

ख़ास बातम्यांच्या बाबतीत शुरेशचा हातखंडा. शुरेशने अवघ्या तीन वर्षाच्या पत्रकारितेतील कारकीर्दीत आपले नेटवर्क तयार केले होते. इतर रिर्पोटर्सना बातमीची कुणकूण लागायच्या अगोदर सुरेश बातमी छापून तयार. वैताग झटकून आंघोळ उरकली. गाडीला जोरात किक मारली अन चाक गरगरा फिरायला लागली. ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यनारायनाने भर सकाळी आग ओकायला सुरूवात केली होती. सुरेशला ऊन्हाचा मोठा वैताग. रिर्पोटरचे काम म्हटले की फिरणे आलेच. सुरेशच्या मते पावसाळ्यात एकदाचा रेनकोट घालता येणार परंतु ऊन्हाच काय? दुपट्टा गुंडाळला तर केसांचा वैताग. नाही गुंडाळला तर ऊन लागण्याची भीती.

विचारचक्र सुरू असतानाच गंजूच्या टपरीसमोर गाडीचे कचकन ब्रेक लागून चाक फिरायची थांबली. गजू पानावर चुना लावता-लावता नमस्कार सुरेश साहेब! सुरेश, ' नमस्कार.. आजच पान रंगायला पाहिजे'. रंगणार की साहेब. बातमी लय झकास आलीय म्हटलं. गजू व सुरेश यांच्यात थोडावेळ त्यांच्या सांकेतिक भाषेत बोलचाल झाली अन सरेशने गाडीची किक मारताच चाके फिरायला लागली. गाडीची चाकं पार्किंगमध्ये थांबली अन सुरेशने टेलिफोनचा ताबा घेतला. टेलिफोनची रिंग घरघरू लागली. कुठे, काय, कस, केव्हा, का? उरकले. चमत्कार, नमस्कार झाले. मग साहेब, आज यायचं काय? काय रामभाऊ साहेब काय म्हणतायत! इत्यादी संपलंय. याला सुरेश राउंड म्हणतोय. सतर्क पत्रकारिता करायची झाल्यास किमान दोनदा राउंड घ्यायलाच पाहिजे, हा सुरेशचा दंडक. ऋतू बदलले, वर्ष गेलीत पण सुरेशची पत्रकारितेची बाराखडी बदलणार नाही.

पाचदहा फिडबॅकचे कॉल घेऊन झाले. बातमी बद्दलच्या प्रतिक्रियाही आटोपल्या. बरेच ऊन-पावसाळे निघून गेल्याने सुरेशला याचे रट्टे-घट्टे पडले होते. संपादक साहेबासोबतची बैठक आटोपली. तोपर्यंत जेवणाचा डबा आला. न्याहारी उरकली. सुरेशने दैनंदिन डायरीतील नोंदी डोळ्याखालून घातल्या. काही टिपणं काढली. गाडीला किक मारताच चाके फिरायला लागली. महानगरपालिकेचा पार्किंगमध्ये चाके थांबली. पत्रकार दालनात पोहचेपर्यंत शंभरेक नमस्कार चमत्कार झाले. महापौर, आयुक्तांची भेट- गाठ झाली. विरोधीपक्ष नेतेही भेटले. इतर पत्रकार मंडळीशी पत्रकार दालनात रोजच्या प्रमाणे मुक्त फटकेबाजी झाली.
सगळ्यांना बीट करून शहरातील प्रमुख घोटाळ्याची बातमी छापल्याने इंप्रेशन एकदम टाईट. परंतु सुरेश माणूस एकदम दिलदार मनाचा. बोलायला मनमोकळा. दोस्तांचा दोस्त. अभिजितने मधातच पिलू सोडलं, 'मग सुरेश आज कोठे बसायचं? सुरेश वैतागला. सालं बसनं, अन फालतू चकाट्या मारत ढोसणं, याचा त्याला आता वैताग यायला लागला होता.

सुरूवातीला सुरेशलाही मजा यायची. सुरेशचे आता राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या मातब्बर लोकांमध्ये बसनं-उठणं होतं. तीन वर्षाच्या अथक प्रयत्नातून त्याने स्वत:ला पत्रकारितेत प्रस्थापित केलं होत. नावं कमावलं होत. शालेय जीवनापासून चालू ठेवलेल्या वाचनात त्याने आजही खंड पडू दिला नव्हता. त्यामुळे त्याला चांगली बैठक प्राप्त झाली होती.

महानगरपालिकेची विधायक कामे, भ्रष्टाचार व राजकीय गटबाजीचे विश्लेषणात्मक व शोध पत्रकारितेचा पाया असणारे वार्ताकन तो करायचाच. यासोबतच सांस्कृतिक प्रांतातील सर्जनशीलतेला वाव असणार लेखनही तो करायचा. सुरेश कलात्मक अभिरूची जोपासणारा माणूस. संगीत, नाटक, साहित्य यात त्यास विशेष रूची. कलात्मक व दर्जेदार कलाकृतींचा त्याच्या संग्रहात समावेश नाही असं कधी झालं नाही. चौफेर वाचन, कलात्मकता जोपासणारा स्वभाव व आडव्या उभ्या क्षेत्रात असणारा त्याचा परिचय, मैत्री यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वात परिपक्वता आली होती. आपणं मिळविलेली पत, प्रतिष्ठा याला गालबोट लागू नये, यासाठी त्याने जपायला सुरूवात केली होती. अनंतानेर, काय सुरेश कसला विचार करतोस यार? असे म्हणत खांद्यावर हात ठेवल्यावर त्याची विचारचक्र थांबली. झपाझप पायऱ्या उतरून सुरेश पार्किंगमध्ये आला अन गाडीला किक बसली. चाके गरगरा फिरायला लागली. ऑफिसमध्ये येऊन त्याने कॉपी टाईप केल्या. बातमी सोडून थेट रूमवर.

नुकत्याच गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेल्या होम थियटरवर त्याने मस्त जगजीत सिंग लावला. गझलचे सुरेल, मंद स्वर वातावरणात पसरल्यावर स्लिपवेलच्या गादीवर पडून तो कॉलेजच्या आठवणीत रंगला. दररोजच्या वैतागापासून आज त्याला निवांत क्षण मिळाले होते. तीन वर्षाअगोदर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व पत्राकरिता विभागात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात महाराष्ट्रातील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांच्या संपादकांसोबत संवाद साधण्याची संधी त्याला मिळाली होती. विद्यार्थ्यामधून सुरेशने महाराष्ट्रातील राजकीय व सांस्कृतिक चळवळीवर केलेल्या विश्लेषणात्मक व तार्किक कसोटीवर टिकणाऱ्या भाषणाने झालेला कौतुकाचा वर्षाव त्यास आजही आठवतो. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात, 'सुरेश ग्रेट, एक्सलंट! हे विभाग प्रमुख व संपादकांचे शब्द आजही त्याला प्रेरणा देतात.

कविता, सुधीर, प्रवीण, केतकी यांच्या घोळक्यात रमेशच्या कँटिनवर चहाचे फुरके मारताना गरम, चुरचुरीत कांदा भजी खाताना केतकीने त्याला सार्वजनिकरीत्या प्रपोज केले होते. 'आय लव्ह यू अँड वूड लाइक टू बी विथ टू फॉरएव्हर! या शब्दांनी सुरेश एकदम चाट पडला होता. मैत्री वगैरे ठीक पण प्रेम वगैरे म्हणजे वैतागच, हे समीकरण त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेलं होत. सुरेश, 'सॉरी केतकी, अँट धीझ क्रुशीयल स्टेज आय हॅव नो टाइम फॉर लव्ह. माय फर्स्ट प्रायऑरिटी इज जर्नालिझम! केतकी, 'सुरेश आय नो दॅट यूर आर टू पॅशनेट अबाउट जर्नालीझम. बट डू नॉट कंफ्यूज प्रोफेशन विथ पर्सनल लाईफ अँड एमोशन्स. वैताग. सुरेश वैतागला. आता प्रवीण, कविता व सुधीरही चालू होणार व यांना कनव्हींस करणे शक्य नाही हे त्याला माहिती होते.

सुरेश सरळ पार्किंगमध्ये, अन गाडीस जोरात किक. चाकांसोबतच विचार चक्रही गरगरा फिरायला लागली. वेताळ टेकडीच्या पायथ्याही ब्रेक लागताच चाके थांबली. टेकडीवर हवसे, नवसे, गवसे सर्वच फिरायला येत असतात. प्रत्येकाच्या जागाही ठरलेल्या. सुरेश सर्व वैताग पार करून सर्वात उंच भागावर जाऊन बसला. संध्याकाळ झाली होती. आल्हाददायक हवा अंगाला स्पर्शून जात होती. संपूर्ण शहराचे मनमोहक दर्शन येथून व्हायचे. सगळीकडे दिवे लागल्याने शहर प्रकाशात न्हाऊन निघाले होते. इतर वेळेस प्रचंड ट्रॅफिक, आवाज व पोलुशनमुळे वैताग देणारे रस्ते शांत, शिस्तबद्ध भासत होते. मिणमिणते दिवे घेऊन गाड्या ये जा करीत होत्या. वैताग घालविण्यासाठी सुरेशचे हे फेमस ठिकाण होते. येथे कोणीही फुकटचा सल्ला देणार नाही किंवा शहाणपण शिकविणारं नाही. डिस्टर्ब करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Thursday, April 1, 2010

इट्स स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहा!

इंडियन प्रिमियर लिगचे सामने बघताना २० षटकांचा खेळ पूर्ण होण्याअगोदरच 'स्ट्रॅटेजिक टाइमआउट' मध्ये, फलंदाज बाद झाल्याबरोबर किंवा कोणतीही संधी मिळताक्षणी होणाऱ्या जाहिरातींच्या भडिमाराने आपण त्रस्त झाला असणार. अस्सल क्रिकेट बहाद्दर, शौकीन आणि एखाद्या संघाचे समर्थक असणाऱ्या प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे काम मधातच घुसडण्यात आलेल्या या जाहिराती करत असतात.

क्रिकेटच्या व्यावसायिकरणासोबतच खेळास एंटरटेनमेंट इव्हेंट बनवण्याची कास आयोजकांनी हाती घेतली आहे हे जाणत्या चाहत्यांच्या लक्षात आलेच असणार. चार तास खच्चून मनोरंजनासाठी मैदानावरील तडाखेबंद फटकेबाजीसोबतच, प्रेक्षकांच्या दिमतीस चीअरलीडर्स आहेतच. बहारदार फटक्यांनी चाहत्यांना खिळवून ठेवण्याची जबाबदारी क्रिकेटपटूंना देण्यात आली आहे. तर प्रेक्षकांना लयबद्ध हालचालींनी घायाळ करण्याचे काम हे चीअरलीडर्सचे.


महामहीम ललित मोदींच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या या लीग स्पर्धेने मिळकतीची कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन भाबड्या चाहत्यांना अगोदरच अवाक केले आहेत. आयोजक, प्रायोजक, संघमालक, खेळाडू, ब्रॉडकास्टर सगळ्यांना खोऱ्याने पैसा ओढण्याचा एककलमी कार्यक्रम ठरवून देण्यात आलेला आहे. मात्र हे सामने बघण्यासाठी टीव्हीसमोर डोळे फोडणारा किंवा हौसेने मैदानावर जाऊन सामने बघणारा प्रेक्षक यापासून वंचितच, त्याने फक्त खिसा हलका करायचा. हा अजबच न्याय झाला राव नाही का?


२०-२० षटकांच्या सामन्यादरम्यान चौफेर फटकेबाजीच्या आतिषबाजीतच मध्येच डोकावणाऱ्या जाहिरातीही रंग उधळत असतात. ब्रेक मध्ये जाहिरातींचे डोकावणे हक्काचेच झाले आहे, मात्र गडी बाद झाला की... चेंडू हरवला की... कुणास दुखापत झाली की... कधीही घुसडणं जरा अतीच झाली. मग क्रिकेट सामना आणि एखाद्या चॅनेलवरचा हिट चित्रपट पाहण्यात फरक काय? असा प्रश्न आपणांस पडला असणारच. क्रिकेटचे एंटरटेनमेंट इव्हेंटमध्ये झालेल्या रूपांतरातच त्याचे गमक आहे.

'अतुल्य' अभिनेता

मराठी नाट्यसृष्टीतून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारया अतुल कुलकर्णी या गुणी व सर्जनशील अभिनेत्याने अगदी थोड्या कालावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला आहे. हे राम, पेज थ्री, चांदनी बार, दम या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षक व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

तब्बल दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून अभिनयाची पावती मिळवली आहे. अभ्यासू अभिनेता अशी ओळख असलेल्या अतुलला आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका करायला आवडतात. त्यामुळे चाकोरीबाहेरचा अभिनेता अशी त्याची ओळख आहे. अतुलचा जन्म बेळगावचा. त्याचे शिक्षण झाले ते सोलापूरात.

शिक्षणात अतुलची गती साधारणच होती. म्हणजे सांगायचं झालंच तर बारावीला तो दोनदा परीक्षेला बसला आणि त्यानंतर अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाची परीक्षा त्याला तीनदा द्यावी लागली. मग त्यानंतर त्याने आपल्या अंतर्मनाला साद देत आपला कौल असलेल्या कला क्षेत्रात शिक्षण घेण्याचे नक्की केले.
त्यासाठी पुन्हा सोलापूरात आला.

इंग्रजी साहित्य घेऊन त्याने पदवी घेतली. इंग्रजी साह्त्यि वाचनाने त्यांच्या सृजनाला, अभिव्यक्तीस वाट मिळाली अन जाणीवा समृद्ध होत गेल्या. याच काळात तो नाटकांशीही जोडला गेला. सोलापूरच्या नाट्य आराधना या ग्रूपबरोबर काम करायला सुरवात केली. सुरवातीला दोन वर्षे तर पडद्यामागचा कलाकार होता.

नंतर त्याला स्टेजवर येण्याची संधी मिळाली आणि नंतर मिळतच राहिली. आता त्याने या क्षेत्राचा गंभीरपणे विचार सुरू केला आणि त्यासाठी शास्त्रसुद्ध शिक्षण घेण्याची आवश्यकता भासू लागली. मग त्याने दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात' प्रवेश घेतला. तेथे त्याला मार्गदर्शन मिळाले ते नसरूद्दीन शहा, रतन थिय्यम आदी मान्यवरांचे. येथेच त्याच्या गुणवत्तेला पैलू पडले. त्याच्यातला कलाकार बाहेर आला.

एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर त्याने पहिले व्यावसायिक नाटक केले ते देवदास व गांधींजींमधील संघर्ष मांडणारे गांधी विरूद्ध गांधी. यात त्याने गांधीजींची भूमिका केली. अतुलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हे नाटक हिंदी व गुजरातीतही झाले. तेथेही ते कौतुकास पात्र ठरले. त्याच्या भूमिकेला गुजरात सरकारचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर एडससंदर्भात माहिती देणारे 'क्रॉसरोडस तसेच मृच्छकटिकम, रतन थिय्यम दिग्दर्शित 'थंबानालू, गिरीश कर्नाड लिखित 'अंजु मलिगे' ही काही नाटके केली. ही सर्व नाटके वेगळ्या प्रकारची आहेत.

सद्या अतुल गुलजार यांच्या कवितांवर आधारीत 'खराशे' चे प्रयोग करतो आहे. मराठी चित्रपटांमधल्या त्याच्या भूमिकाही वेगळ्या आहेत. 'देवराई' चित्रपटात त्यांनी साकारलेली स्किझोफ्रेनिक पात्राची भूमिका दाद मिळवून गेली. 'चकवा, दहावी फ, वास्तुपूरष, नटरंग हे त्याचे अन्य काही चित्रपट. अतुल खर्‍या अर्थाने ओळखला जाऊ लागला तो हिंदी चित्रपटांमुळे.

कमल हासनच्या 'हे राम' मधील अभ्यंकर या पात्रातील अभिनयानेच त्याने चुणूक दाखवली होती. त्याचे फळही त्याला सहाय्यक अभिनेत्यासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने मिळाले. त्यानंतर मग 'चांदनी बार, पेज थ्री, खाकी, ८८ अँटॉप हिल, सत्ता, दम' या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचेही कौतुक झाले.

शिवाय त्याने काही इतर भाषक म्हणजे इंग्रजी, तेलगू, कन्नड चित्रपटातही काम केले आहे. त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कलाकार हा नेहमी स्वतच्या अभिव्यक्तीबाबत असमाधानी असतो. पूर्णत्वासाठी त्याचा स्वतःशीच संवाद सुरू असतो. आपण रंगविलेल्या पात्रांचा अभ्यास करीत कच्चे दुवे हेरून त्याला पूर्णत्व देतानाच कलेच्या अभिव्यक्तीबाबत विविध प्रयोग करीत असतो.

अतुलला हे सारे तंतोतंग लागू पडते. त्यासाठी त्यांनी रंगभूमीशी आपले नाते आजही कायम ठेवले आहे. अतुल केवळ अभिनेता नाही, तर त्याच्यात एक संवेदनक्षम माणूसही दडला आहे. म्हणून नर्मदा बचाव आंदोलनासंदर्भात विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे यासाठी मेधा पाटकरांनी दिल्लीत आंदोलन केले होते. त्यावेळी तेथेच असणाऱ्या आमीर खान व अतुल कुलकर्णी या कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला होता व त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्यानंतरही तो आपल्या भूमिकेशी ठाम होता.