Monday, November 21, 2011

उमेश यादव: भारतीय आक्रमणाची तेजतर्रार धार


कोळसा खाणकामगाराचा मुलगा भारताचा प्रमुख क्रिकेटपटू होऊ शकतो काय....?.. शाळामास्तरचा मुलगा देशातील प्रमुख उद्योगपती होऊ शकतो काय, शेतकर्‍याचा मुलगा पंतप्रधान होऊन देश चालवू शकतो काय....?

आजही गुलामगिरीचा पगडा असलेल्या सामान्य भारतीय मनासाठी हे स्वप्नवत आहे. आपल्यासारखा गरीब, सामान्य व्यक्ति इतके महान कार्य करण्यास सक्षम आहोत काय याबाबत त्यांच्या मनात साशंकताच असते. धनाढ्य,गर्भश्रीमंत, उच्चशिक्षित, प्रशासन, सत्ताकारणात वरिष्ठ पदावर असलेली माणसंच ही महान कामं पेलु शकतात, असा एक भाबडा समज त्याच्या मानसिकतेत रूजलेला असतो. शुन्य आत्मविश्वास आणि क्षमतांची, कौशल्याची जाण नसलेले सामान्यमण त्या मानसिकतेच्या वलयातच गुरफलेलं असते. मात्र शतकानुशतके समाजमणाच्या मानगुटीवर बसलेल्या या मानसिकतेस नाकारून स्वत:तील क्षमता, कौशल्य, जीद्द, आणि मेहनतीच्या जोरावर कुणीही काहीही करू शकतो, बनू शकतो हे अनेकांनी दाखवून दिले आहे. भारतीय क्रिकेटपटू उमेश यादव हा त्यातलाच एक.

कोलकात्यात वेगवान मार्‍याने विंडीज संघाची दाणादाण उडवणार्‍या उमेशने तमाम तरूणाईच्या आशा पल्लवित केल्या आहेत. मनगटात दम आणि डोक्यात विचार असल्यास कोणताच अडथळा, कमतरता तुमचा मार्ग रोखू शकत नाही, हा आत्मविश्वास त्याला जागवला आहे. महाराष्ट्र राज्यातील तथाकथीत मागास समजल्या जाणार्‍या विदर्भात चंद्रपुर जिल्हा आहे. येथील माजरी हे त्याचे गांव. वडिल येथील कोळसा खाणीत काम करतात. विदर्भातील आंध्र प्रदेशला लागून असलेल्या भागात कोळसा खाणी आहेत. या भागात औष्णिक विजनिर्मिती प्रकल्पही असून राज्याला ‍बहुतांश विद्युतपुरवठा येथूनच होतो. हा भाग खनिज संपत्तीने समृद्ध असण्यासोबतच वनश्रीने नटलेला आहे. म्हणूनच राज्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असल्यानंतरही तो तथाकथित मागास आहे, हे न समजणारे कोडे. मात्र या उपेक्षित परिस्थितीवर मात करून तो भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला आहे, ही त्याची अचिव्हमेंट आहे.

उमेशचे बालपण येथील राकट देशा...कणखर देशश... दगडांच्या देशातंच गेले. सर्वात दूर कोळसा कोण फेकतो म्हणून मित्रांसोबत त्याच्या पैजा लागायच्या आणि अंगकाठीने दांडगा, राकट, उंचपुरा असलेला उमेशच नेहमी पैजा मारायचा. गरीब कुटुंबात कोळसा खाणीच्या प्रदेशात बालपण गेले. भाकरी खाऊन मिंत्रासोबत खेळणं आणि परिस्थितीनुसार पडलेली कामं करत शरीर चांगल कसल्या गेलं. आपण क्रिकेटपटू बनून देशाकडून खेळू हे त्याने स्वप्नातही पाहिले नव्हते. पोलिसात भरती व्हायचे इतकेच काय ते त्याच्या मनाने घेतले होते. त्यासाठी शरीर बलदंड व्हावे म्हणून शारीरिक कसरत, धावण्याचा व्यायाम हा त्याच्या दिनक्रम बनला होता.

वजनी कोळसे फेकता फेकता उमेश बंदुकीच्या गोळीसारखा चेंड़ फेकु लागला आणि बघताबघता वेगवान गोलंदाज म्हणून नावारूपास आला. २००८ साली नोव्हेंबर महिन्यात त्याने रणजी पर्दापण केले. वेगवान गोलंदाजांची वाणवा असलेल्या आपल्या देशात सारखा १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणार्‍या उमेशने अवघ्या दोन वर्षात राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले
आणि २०११ मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून आयपीएल स्पर्धेत खेळला. यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या एमर्जिंग प्लेअर्स स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करून आपण आंतरराष्ट्रीय स्तराचे मटेरियल असल्याचे सिद्ध केल्याबरोबर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाली आणि त्याने दिल्लीत पहिल्या कसोटीतच आपली छाप सोडली. कोलकाता कसोटीत तर उमेशच्या गोलंदाजीत चांगलीच धार जाणवली. त्याच्या गोलंदाजीत सामण्यागणीक झपाट्याने सुधारणा होत आहे. सातत्याने १४० पेक्षा जास्त वेगावे मारा करण्यासोबतच चेंडू जुना झाला म्हणजे रिव्हर्स स्विंग करण्यात त्याचा हातखंडा आहे. आतापर्यंत भारतीय संघास सतावणारे प्रतिस्पर्धी फलंदाजीचे शेपटाची वळवळ थांबवली ती उमेशनेच.
१४५ च्या वेगाने भेदक मारा करून तो अवघ्या ५ मिनिटात शेपूट गुंडाळून डांव संपृष्टात आणतो. कोलकाता कसोटीत त्याने घेतलेल्या ७ बळींपैकी ५ जणांचा त्याने त्रिफळा उद्वस्त करताना विंडीजची फलंदाजी अक्ष.रशा कापून काढली होती.

त्याच्या गोलंदाजीचे विश्लेषण 'रॉ स्पेस विथ ब्रेन' असे करता येईल. त्याच्या गोलंदाजीत सुसाट वेगासोबतच अचूकता दिसून येते. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता तो धिरोदात्तपणे गोलंदाजी करतो. त्याच्या चेहर्‍यावर तणावाऐवजी शांत भाव असतात. ही मानसिकता मोठ्या खेळाडूची ओळख आहे. आपणाजवळ क्षमता, कौशल्य तर आहे मात्र कणखर मानसिकता नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर फार काळ टिकणे शक्य नाही. आपात्कालीन परिस्थितीत जो खिंड लढवतो, तोच खरा योद्धा. उमेशने आतापर्यंत २ कसोटीतून ९ बळी घेतले असून आगामी ऑस्ट्रेलिया दौर्‍यात त्याला चांगली संधी आहे. ऑसीजना सळो कि पळो करून सोडण्याची धमक त्याच्यात असून भारतीय संघास दमदार कामगिरी नोंदवण्यात त्याचा महत्तवाचा वाटा असेल. ब्राव्हो उमेश!

Sunday, September 4, 2011

अनिल अवचट


डॉ. अनिल अवचट वास्तववादी लेखक आहेत. वातानुकूलित खोलीत बसून कॉफीचे भुरके मारत विश्लेषण करणार्‍या किवा कल्पनांचे महाल उभारणार्‍या लेखकांपेक्षा डॉ. अवचट यांची जातकुळी जरा वेगळी आहे. कोणतीही समस्या किवा प्रश्नावर लिहिण्या अगोदर ते ती परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवतात.

त्यांच्या लेखनाची शैली व पद्धतच तशी आहे. थोडक्यात रिपोर्ताज पद्धतीचे लेखन त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले. त्यांच्या वेगळ्या नि वास्तववादी शैलीमुळे लोकांना ते आवडलेही. कृतीवर विश्वास ठेवणारया अवचटांचे लेखन अनुभव व कृतीतून उमटते.

त्यामूळेच वाचक जेव्हा अवचटांना वाचतो तो त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. ते वाचकांना वस्तुनिष्ठ व वास्तव अनुभव देतात. अवचटांची लेखनशैली साधी, सरळ व अनलंकृत आहे. अवचटांचा पिंड आहे कार्यकर्त्याचा. समाजसेवकाचा. त्यांनी प्रश्नांना, समस्यांना वरवरून बघितले नाही, तर समस्येच्या थेट मुळाशी पोहचण्याचा त्यांचा आग्रह असतो. डॉ. अवचट यांनी पुण्यात. बी. जे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली.

वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही त्यांच्या चर्चा चालायच्या त्या सामाजिक क्रांती, सुधारणा, जागृती, विकास या विषयांवरच. डॉ अवचटांच्या बी. जे. मधील मित्रांमध्ये डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ जब्बार पटेल यांचा समावेश होता. कलाक्षेत्रात रस असणारे हे त्रिकूट संपूर्ण महाविद्यालयात 'फेमस' होतं. महाविद्यालयातील स्नेहसंमेलने, महोत्सव, आंदोलने हे यांचे प्रांत. तिघांनीही वैद्यकीय पेशा सोडून कला, समाजसेवा, व राजकीय क्षेत्रांत स्वतःला वाहून घेतले.

डॉ. अवचट यांनी डॉक्टरकी सोडून संपूर्ण वेळ समाजसेवा व लेखनाला द्यायचा निर्णय घेतला. या काळात त्यांच्या पत्नीची त्यांना खंबीर साथ लाभली. मादक द्रव्याच्या आहारी गलेले तरूण, आहारी जाण्याची कारणे व आहारी गेल्यानंतर कौटूंबिक, सामाजिक, आर्थिक पातळीवर उभी राहणारी आव्हाने यांचा अभ्यास केला. यातून आलेल्या अस्वस्थतेतून 'गर्द' हे पुस्तक निर्माण झाले. मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या तरूणाईला वाचविण्यासाठी काही तरी करायला पाहिजे या अस्वस्थतेतून 'मुक्तांगण' ही संस्था उभी राहिली.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी मुक्तांगणच्या उभारणीत प्रारंभी हातभार लावला. कोंडमारा, कार्यरत, माणसे, जगण्यातील काही, धागे उभे आडवे ही डॉ. अवचटांची काही पुस्तके. डॉ अवचटांनी 'स्वतविषयी' हे आत्मपर पुस्तक लिहिले आहे.

स्वतःविषयी हा स्वतच्याच उभ्या आडव्या आयुष्याचा वस्तूनिष्ठ वृतांत आहे. डॉ अवचट यांच्यात कलावंत खच्चून भरला आहे. डॉ अवचट उत्तम रेखाटन, चित्रकला, शिल्पकला यासोबतच ओरीगामी कलेत त्यांनी प्राविण्य मिळविलेले आहे. चित्रकला, ओरीगामी हे त्यांचे फावल्या वेळतील छंद आहेत. या छंदांबद्दल त्यांनी 'छंदाविषयी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

भाऊ पाध्ये: मुंबईतील संक्रमणकाळ टिपणारा लेखक


भाऊ पाध्ये हे सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला आहे.
मुंबईसारख्या विविधांगी व मिश्र संस्कृती असलेल्या शहरात संक्रमणकाळात झालेले बदल व त्याचा समाजातील सर्वच स्तरावर विशेषत: तरूण पिढीवर झालेल्या परिणामांना त्यांनी आपल्या लेखनातून अभिव्यक्ती दिली आहे.

भाऊंनी 'वासूनाका, अग्रेसर, राडा' या कादंबर्‍या लिहिल्या. 'राडा' मध्ये उच्चभ्रू कुटूंबातील तरूण, मनाविरूद्ध झालेले निर्णय सहन करू न शकल्याने वाहवत जातो. महानगरीय वातावरणात विविध सामाजिक, राजकीय प्रवाह निर्माण होत असतात व त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम समाजमनावर होत असतो.

अशा परिणामाच्या काही पिढ्या असतात. सत्तरच्या दशकात शिवसेनेने मुंबईत आपला प्रभाव निर्माण करायला सुरवात केली होती. कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर असलेल्या या शहरात कापड गिरण्या व गिरणी कामगार यांची वेगळीच संस्कृती निर्माण झाली होती.

बहुतांश कामगार वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपरर्‍यातून आला होता. शिवसेनेचा अजेंडा मराठी मनाला भुरळ घालणारा होता. त्यामुळे महानगरीय वातावरणात मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाणार्‍या मराठी तरूणांना शिवसेना हे हक्काचे व्यासपीठ मिळाले.

त्यामुळे शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झाला. कामगार संघटनांतून कम्युनिस्टांची हकालपट्टी करून सेनेने मराठी ताकद आपल्या पाठीशी उभी केली. 'राडा' मध्ये ही सारी पार्श्वभूमी येते. किंबहूना या वातावरणातूनच तिची निर्मिती झाली आहे.

पाध्येंनी या बदलांमुळे होणार्‍या परिणामांचे मानसिक विश्लेषण न करता कादंबरीत संवादात्मक व पटकथात्मक, सरळ मांडणी करून विश्लेषण व निर्णयाचे स्वातंत्र्य वाचकांवर सोपविले आहे. त्या काळात ही कादंहबरी वादग्रस्तही ठरली होती.

पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत.

भीमाशंकर: सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातून वन्यजीवदर्शन


भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध येथेच केला होता. यावेळी शंकरास आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंदिराच्या मागे मोक्षकुंड असून घनदाट जंगल आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या येथील जंगलातून फिरताना 'शेकरू' हा खारीसारखा दिसणारा दुर्मिळ प्राणी आपले लक्ष वेधून घेईल. येथील जंगल सदाहरित आहे. पाठीवर सॅक टाकून येथील जंगलातूनभटकंतीचा आनंद अवर्णनीय असतो. पहाटेस दाट झाडीतून सूर्याची किरणे डोकावण्याच्या क्षणी पक्षांच्या कर्णमधुर किलबिलाटात येथील दर्‍याखोर्‍यातून सैर करण्याची अनुभूती विसरणे अशक्यच. पक्षीनिरीक्षक व जिज्ञासू वृत्तीच्या पर्यटकांसाठी हे आदर्श ठिकाण आहे. निसर्गप्रेमींना येथे स्वर्ग भूतलावर अवतरल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही.

सह्याद्रीच्या कड्या-कपार्‍यात पावसाच्या वर्षावास सुरूवात झाल्यानंतर येथील सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. येथून भीमा नदी उगम पावून कर्नाटकात कृष्णा नदीत विलीन पावते. येथील जंगल हिरवाईने नटलेले असून येथे आंबे, जांभूळ, हिरडा, बेहडा, बांबू व औषधी वनस्पतीने समृद्ध आहे. अभयारण्याचे वनक्षेत्र मिश्रित वनश्रीने समृद्ध असल्याने येथे जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो.

पर्यटकांना येथे सृष्टीसौंदर्याचा अभूतपूर्व साक्षात्कार घडतो. साहसी पर्यटक व ट्रेकर्ससाठीही हे नंदनवन आहे. दूरवर पसरलेल्या हिरव्यागार पहाडाच्या रांगांमधून वाहणार्‍या नद्यांचा परिसर पर्यटकांना साद घालतो. याशिवाय हनुमान टँक, नागफणी पॉंईंट येथेही भेट देता येईल. येथून चाळीस किलोमीटरवरील डिंभे डॅम विशेष प्रसिद्ध असून येथे आठवड्याच्या शेवटी येथे पर्ययकांच्या गर्दी करतात. वर्षातील काही महिने सोडले तर तिन्ही ऋतूत येथे आनंद घेता येते. पर्यटन महामंडळाने येथे निवासाची व्यवस्था केली आहे. टेहळणी मनोर्‍यांहून येथील वन्यजीव निरीक्षणाचाही आनंद घेता येईल.

पोहचायचे कसे?
विमान, रेल्वे व रस्ते मार्गाने येथे पोहचता येते. विमानाने पोहचायचे झाल्यास सव्वाशे किलोमीटरवर पुणे विमानतळ आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरहून (62 किमी) येथे पोहचता येते.

निसर्गरम्य फणसड अभयारण्यातून भटकंती


निसर्गाची विविधांगी रूपे याची देही याची डोळा अनुभवण्यातील आनंद अवर्णनीय असतो. कोकणातील फणसड वन्यजीव अभयारण्यात आपणांस याची प्रचीती येईल. विधात्याने सृष्टी सौंदर्याची लयलूट केलेल्या निसर्गासोबतच नयनरम्य समुद्रकिनारे हे फणसड अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. रायगड जिल्हयातील रोहा व मुरूड तालुक्यात सुमारे त्रेपन्न चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात हे अभयारण्य पसरले आहे.

जैवविविधतेने समृद्ध नटलेल्या समुद्रकिनारपट्टीलगतच्या जंगलाची विविध रूपे पाहायची ती येथेच. अभयारण्यात सुमारे एकवीस जातींच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. याशिवाय विविध वनस्पतींच्या सुमारे एक्क्यांनऊ प्रजातीं येथे आहेत. यावरून येथील जैविक विविधता लक्षात येईल. औषधी वनस्पतींचाही येथे खजिना आहे. विधात्याने नैसर्गिक जैवविविधतेची येथे लयलूट केली आहे.

सांबर, चित्ता, जंगली अस्वल या प्राण्यांचा येथील वनश्रीने नटलेल्या जंगलात मुक्त संचार आढळतो. येथील हिरव्यागार जंगलातून पक्षांच्या सुरेल सुरावटींच्या सानिध्यात मुक्त भटकंतीचा अनुभव अविस्मरणीय असतो. सुपेगावातून निसर्ग सहल नैसर्गिक सौंदर्याचा साक्षात्कार घडवते. निसर्गप्रेमींना माजगांव येथील निसर्ग केंद्रासही भेट देता येईल. अरबी समुद्राच्या आकाशास भिडणार्‍या लाटा झेलत स्थितप्रज्ञासारखा उभा असलेल्या जंजीर्‍यास भेट द्यायला विसरू नका. येथे थरार, रोमांच, साहस, अशा मिश्रित भावनांच्या अद्वितीय अनुभवाचे आपण धनी व्हाल.

अरबी समुद्राच्या आकाशास भिडणार्‍या लाटा झेलत स्थितप्रज्ञासारखा उभा असलेल्या जंजीर्‍यास भेट द्यायला विसरू नका. येथे थरार, रोमांच, साहस, अशा मिश्रित भावनांच्या अद्वितीय अनुभवाचे आपण धनी व्हाल. ऑक्टोबर ते एप्रिल ही येथे भेटीची उत्तम वेळ आहे. निर्सगाच्या सानिध्यात काही काळ घालवायचा असल्यास येथे निवासाची व्यवस्थाही आहे.

कसे पोहचायचे?
विमान, रस्ते व रेल्वेने येथे पोहचता येते. मुंबई हे जवळचे विमानतळ आहे. कोकण रेल्वेने जायचे झाल्यास रोहा हे येथून तीस किलोमीटर अंतरावर स्टेशन आहे. मुंबईहून येथील अंतर दीडशे तर अलिबागहून पन्नास किलोमीटरवर अभयारण्य आहे.

Monday, August 29, 2011

अण्णांच्या आंदोलनाने कॉंग्रेसमध्ये भूकंप!


कॉंग्रेसचे खासदार प्रवीण ऐरण यांनी अण्णा हजारे मुद्याप्रकरणी पक्षात चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाने अण्णांच्या आंदोलनाचा मुद्दा योग्य प्रकारे हाताळला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींना बदानाम करण्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी हे कारस्थान केले काय, हे बाहेर यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.


लोकपालप्रश्नी अहिंसक आंदोलन करणारे गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे आंदोलन हाताळताना कॉंग्रेस पक्षाने सुरूवातीपासून शेवटपर्यंत घोडचूका केल्याचे तमाम भारतीयांनी पाहिलेच आहे.

यातून या आंदोलनाबाबत पक्षात एकवाक्यता नाही, पक्षात अंतर्गत मतभेद आहेत, हे स्पष्ट होतच होते. सपुआ सरकारने तमाम भारतीयांच्या भावनांचा अनादर करत अण्णांचे जनआंदोलन दपडशाहीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र त्यात यश न आल्यावर सरकारची पिछेहाट सुरू झाली. यातून सरकारसोबतच कॉंग्रेस पक्षाची नाचक्की झाली. याप्रकरणी पक्ष आणि सरकारमध्ये कधीच एकवाक्यता दिसली नाही.

अण्णांनी उपोषण सोडावे यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत प्रस्ताव मांडून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यास सर्वपक्षीय समर्थन मिळण्यासोबतच संसदेनेही अण्णांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र दुसर्‍या दिवशी कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आपण 'गेम चेंजर' असल्याचा आभास निर्माण करत लोकपालला घटनात्मक दर्जा असावा, निवडणूक आयोगप्रमाणेच लोकपालही घटनात्मक संस्था असावी, असे वक्तव्य संसदेत करत मुद्यास वेगळेच वळण दिले होते.

यामुळे अण्णांच्या तीन मुद्यांवर संसदेत सहमती निर्माण करण्याच्या प्रयत्नास खीळ बसल्याने अण्णांचे उपोषण सुटण्याऐवजी आणखी पुढे ढकलल्या गेले होते. नंतर प्रकरण शेकणार असल्याचे लक्षात आल्यावर सपुआ सरकारने संसदेत चर्चा करून मुद्यांवर सहमती झाल्याचे सभागृहाचे मत अण्णांना कळवल्यावर तेराव्या दिवशी उपोषण संपले होते. कॉंग्रेसमध्ये अण्णा आंदोलन हाताळण्याबाबत असलेले अंतर्गत मतभेद प्रवीण ऐरन यांच्या मागणीने चव्हाट्यावर आले आहेत.

Sunday, August 28, 2011

वतन मे फिजा बदली, शुरूवात नये दौर की..


भ्रष्ट्राचाराविरूद्ध लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी राजधानीत इंडिया गेटवर जनसागर लोटला आहे. 'मै भी अण्णा तु भी अण्णा, अब तो सारा देश है अण्णा' चे नारे देत लोक जनआंदोलनाचा विजय साजरा करत आहेत.

संध्याकाळनंतर येथे जवळपास २५ हजार लोक जमा झाले असून जल्लोषाच्या वातावरणाने परिसर निनादून गेला आहे. लोकशाहीत जनभावना लक्षात घेऊन कायदे बनवले गेले पाहिजे, जनभावनेचा आदर देशकारभार हाकताना राज्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे, लोकशाहीत जनताच सर्वश्रेष्ठ असली पाहिजे, यासाठी जनजागृती आवश्यक असते. हे जीवंत लोकशाहीचे उदाहरण आहे. असल्या अहिंसात्मक जनजागृती करणार्‍या आंदोलनानेच खर्‍या अर्थाने प्रजासत्ताक प्रस्थापित होईल आणि लोकशाही अधिक सुदृढ व प्रगल्भ होईल.

अशा तमाम भारतीयांच्या भावना, इच्छा आणि आकांक्षा होत्या, आहेत आणि राहिल. मात्र राज्यकर्ते राजधर्म विसरले म्हणजे लोकशाहीचा गळा घोटल्या जातो, अराजक व अनागोंदीकडे राष्ट्राची वाटचाल सुरू होते आणि जनतेचा हुंकार दडपण्यासाठी दमन, दडपशाही आणि हुकुमशाहीकडे झुकणारी राजवट घट्ट करण्यासाठी शासनकर्त्यांचे हात सरसावतात. भ्रष्ट्राचार सार्वत्रिक होतो आणि लोकांचे हुंकार दडपले जातात. याविरूद्ध देशवासियांच्या मनात असंतोष खदखदत असतो फक्त त्याला असंतोषास दिशा देणारे नेतृत्व आणि व्यासपीठ हवे असते. अण्णांच्या आंदोलनाने ते मिळाले आणि सारा देश रस्त्यावर उतरला आणि त्यानंतर काय झाले ते आपण पाहतच आहोत....

अण्णागिरीने राष्ट्रात नवचैतन्य संचारले असून त्याचेच प्रत्यंतर दिल्ली, मुंबई आणि सार्‍या देशभर निघालेल्या विजय यात्रांमधून येत आहे. देशभर हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या लाखोंच्या जनांच्या प्रवाहातून आता 'नया दौर'ची सुरूवात झाल्याचेच हे घोतक आहे.