Friday, March 26, 2010

सकाळचा चहा

पहाटेच कामास सुरूवात केली. बायको झोपेत असताना कार्यालयासाठी निघणे फारसं रूचत नाही, मात्र उपाय नाही. पहाटेची वेळ तशी प्रसन्न, ताजीतवानी. सगळीकडे नितांत शांतता, या पहाटेच्या कॅनव्हासवर सुर आणि रंग उमटणार ते फक्त पक्षांच्या किलबिलाटाचे आणि सुर्योदयाचे.
सृष्टित पहाटेच्या रंगोत्सवास सुरूवात होतेसरशी स्वत:स कामात गढवून घेणे, यातही एक आनंद असतो. लहानपणापासून वडिलांनी वळण लावलल्यामुळे माझ्या दिवसांस पहाटेपासूनच सुरूवात होते. रात्री लवकर झोपी जाऊन पहाटेच्या प्रहरी निद्राराणीच्या कुशीतून बाहेर पडून सुर्योदयाची किरणे बाहूत घेणे मनास सुखद अनुभव देवून जाते.

निद्राराणीची याबाबत विशेष तक्रार नसते, कारण माझ्या लहानपणापासून तिच्या अंगवळणी पडले आहे. मात्र माझ्या राणीसाठी हे असहनीय असते. रात्रीतली बेधुंदी अजूनही डोळ्यात तरळत असलेल्या राणीस अशावेळी मी हवा असतो. सकाळच्या सारखझोपेतली साखर माझे तिच्यासोबत असण्यानेच घातली जात असते. नाहीतर तिला सकाळचा चहा कडू घातल्यासारखा जाणवतो. मात्र सकाळी अनपेक्षितपणे तिच्यासोबत चहा घेण्याचा योग जुळवून आणून मी तिला सरप्राईस नक्कीच देणार!


राणीस सरप्राईस खूप आवडते. ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे तिच्यासमोर स्वारींच हजर होणे तिला सुखावून जाते. चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहतो आणि डोळ्यात एक चमक, लकाकी. तिला किती आनंद होत असेल हे मोजता येणार नाही, मात्र तिच्या प्रेमवर्षावातून होणार्‍या अनुभूतीतून मी कयास बांधत असतो.

1 comment:

  1. सर्वश्री पालोदे महोदय, तुमचे सर्व लेख वाचले. तुम्ही लिहिता खूपच छान ! पण माझी एक आपल्याला नम्र विनंती आहे.विनाकरणच आपण इंग्रजी शब्दांचा जास्त वापर करता.जेथे मराठी सुंदर शब्द वापरु शकतो तेथे इंग्रजी शब्दांनी रसभंग होतो असं मला वाटतं.
    आपण कृपया माझा शब्दकळा हा लेख वाचावा अशी विनंती आहे.

    ReplyDelete