Sunday, September 4, 2011

अनिल अवचट


डॉ. अनिल अवचट वास्तववादी लेखक आहेत. वातानुकूलित खोलीत बसून कॉफीचे भुरके मारत विश्लेषण करणार्‍या किवा कल्पनांचे महाल उभारणार्‍या लेखकांपेक्षा डॉ. अवचट यांची जातकुळी जरा वेगळी आहे. कोणतीही समस्या किवा प्रश्नावर लिहिण्या अगोदर ते ती परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवतात.

त्यांच्या लेखनाची शैली व पद्धतच तशी आहे. थोडक्यात रिपोर्ताज पद्धतीचे लेखन त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले. त्यांच्या वेगळ्या नि वास्तववादी शैलीमुळे लोकांना ते आवडलेही. कृतीवर विश्वास ठेवणारया अवचटांचे लेखन अनुभव व कृतीतून उमटते.

त्यामूळेच वाचक जेव्हा अवचटांना वाचतो तो त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. ते वाचकांना वस्तुनिष्ठ व वास्तव अनुभव देतात. अवचटांची लेखनशैली साधी, सरळ व अनलंकृत आहे. अवचटांचा पिंड आहे कार्यकर्त्याचा. समाजसेवकाचा. त्यांनी प्रश्नांना, समस्यांना वरवरून बघितले नाही, तर समस्येच्या थेट मुळाशी पोहचण्याचा त्यांचा आग्रह असतो. डॉ. अवचट यांनी पुण्यात. बी. जे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली.

वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही त्यांच्या चर्चा चालायच्या त्या सामाजिक क्रांती, सुधारणा, जागृती, विकास या विषयांवरच. डॉ अवचटांच्या बी. जे. मधील मित्रांमध्ये डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ जब्बार पटेल यांचा समावेश होता. कलाक्षेत्रात रस असणारे हे त्रिकूट संपूर्ण महाविद्यालयात 'फेमस' होतं. महाविद्यालयातील स्नेहसंमेलने, महोत्सव, आंदोलने हे यांचे प्रांत. तिघांनीही वैद्यकीय पेशा सोडून कला, समाजसेवा, व राजकीय क्षेत्रांत स्वतःला वाहून घेतले.

डॉ. अवचट यांनी डॉक्टरकी सोडून संपूर्ण वेळ समाजसेवा व लेखनाला द्यायचा निर्णय घेतला. या काळात त्यांच्या पत्नीची त्यांना खंबीर साथ लाभली. मादक द्रव्याच्या आहारी गलेले तरूण, आहारी जाण्याची कारणे व आहारी गेल्यानंतर कौटूंबिक, सामाजिक, आर्थिक पातळीवर उभी राहणारी आव्हाने यांचा अभ्यास केला. यातून आलेल्या अस्वस्थतेतून 'गर्द' हे पुस्तक निर्माण झाले. मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या तरूणाईला वाचविण्यासाठी काही तरी करायला पाहिजे या अस्वस्थतेतून 'मुक्तांगण' ही संस्था उभी राहिली.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी मुक्तांगणच्या उभारणीत प्रारंभी हातभार लावला. कोंडमारा, कार्यरत, माणसे, जगण्यातील काही, धागे उभे आडवे ही डॉ. अवचटांची काही पुस्तके. डॉ अवचटांनी 'स्वतविषयी' हे आत्मपर पुस्तक लिहिले आहे.

स्वतःविषयी हा स्वतच्याच उभ्या आडव्या आयुष्याचा वस्तूनिष्ठ वृतांत आहे. डॉ अवचट यांच्यात कलावंत खच्चून भरला आहे. डॉ अवचट उत्तम रेखाटन, चित्रकला, शिल्पकला यासोबतच ओरीगामी कलेत त्यांनी प्राविण्य मिळविलेले आहे. चित्रकला, ओरीगामी हे त्यांचे फावल्या वेळतील छंद आहेत. या छंदांबद्दल त्यांनी 'छंदाविषयी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

भाऊ पाध्ये: मुंबईतील संक्रमणकाळ टिपणारा लेखक


भाऊ पाध्ये हे सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला आहे.
मुंबईसारख्या विविधांगी व मिश्र संस्कृती असलेल्या शहरात संक्रमणकाळात झालेले बदल व त्याचा समाजातील सर्वच स्तरावर विशेषत: तरूण पिढीवर झालेल्या परिणामांना त्यांनी आपल्या लेखनातून अभिव्यक्ती दिली आहे.

भाऊंनी 'वासूनाका, अग्रेसर, राडा' या कादंबर्‍या लिहिल्या. 'राडा' मध्ये उच्चभ्रू कुटूंबातील तरूण, मनाविरूद्ध झालेले निर्णय सहन करू न शकल्याने वाहवत जातो. महानगरीय वातावरणात विविध सामाजिक, राजकीय प्रवाह निर्माण होत असतात व त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम समाजमनावर होत असतो.

अशा परिणामाच्या काही पिढ्या असतात. सत्तरच्या दशकात शिवसेनेने मुंबईत आपला प्रभाव निर्माण करायला सुरवात केली होती. कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर असलेल्या या शहरात कापड गिरण्या व गिरणी कामगार यांची वेगळीच संस्कृती निर्माण झाली होती.

बहुतांश कामगार वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपरर्‍यातून आला होता. शिवसेनेचा अजेंडा मराठी मनाला भुरळ घालणारा होता. त्यामुळे महानगरीय वातावरणात मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाणार्‍या मराठी तरूणांना शिवसेना हे हक्काचे व्यासपीठ मिळाले.

त्यामुळे शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झाला. कामगार संघटनांतून कम्युनिस्टांची हकालपट्टी करून सेनेने मराठी ताकद आपल्या पाठीशी उभी केली. 'राडा' मध्ये ही सारी पार्श्वभूमी येते. किंबहूना या वातावरणातूनच तिची निर्मिती झाली आहे.

पाध्येंनी या बदलांमुळे होणार्‍या परिणामांचे मानसिक विश्लेषण न करता कादंबरीत संवादात्मक व पटकथात्मक, सरळ मांडणी करून विश्लेषण व निर्णयाचे स्वातंत्र्य वाचकांवर सोपविले आहे. त्या काळात ही कादंहबरी वादग्रस्तही ठरली होती.

पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत.

भीमाशंकर: सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातून वन्यजीवदर्शन


भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध येथेच केला होता. यावेळी शंकरास आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मंदिराच्या मागे मोक्षकुंड असून घनदाट जंगल आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या येथील जंगलातून फिरताना 'शेकरू' हा खारीसारखा दिसणारा दुर्मिळ प्राणी आपले लक्ष वेधून घेईल. येथील जंगल सदाहरित आहे. पाठीवर सॅक टाकून येथील जंगलातूनभटकंतीचा आनंद अवर्णनीय असतो. पहाटेस दाट झाडीतून सूर्याची किरणे डोकावण्याच्या क्षणी पक्षांच्या कर्णमधुर किलबिलाटात येथील दर्‍याखोर्‍यातून सैर करण्याची अनुभूती विसरणे अशक्यच. पक्षीनिरीक्षक व जिज्ञासू वृत्तीच्या पर्यटकांसाठी हे आदर्श ठिकाण आहे. निसर्गप्रेमींना येथे स्वर्ग भूतलावर अवतरल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही.

सह्याद्रीच्या कड्या-कपार्‍यात पावसाच्या वर्षावास सुरूवात झाल्यानंतर येथील सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. येथून भीमा नदी उगम पावून कर्नाटकात कृष्णा नदीत विलीन पावते. येथील जंगल हिरवाईने नटलेले असून येथे आंबे, जांभूळ, हिरडा, बेहडा, बांबू व औषधी वनस्पतीने समृद्ध आहे. अभयारण्याचे वनक्षेत्र मिश्रित वनश्रीने समृद्ध असल्याने येथे जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो.

पर्यटकांना येथे सृष्टीसौंदर्याचा अभूतपूर्व साक्षात्कार घडतो. साहसी पर्यटक व ट्रेकर्ससाठीही हे नंदनवन आहे. दूरवर पसरलेल्या हिरव्यागार पहाडाच्या रांगांमधून वाहणार्‍या नद्यांचा परिसर पर्यटकांना साद घालतो. याशिवाय हनुमान टँक, नागफणी पॉंईंट येथेही भेट देता येईल. येथून चाळीस किलोमीटरवरील डिंभे डॅम विशेष प्रसिद्ध असून येथे आठवड्याच्या शेवटी येथे पर्ययकांच्या गर्दी करतात. वर्षातील काही महिने सोडले तर तिन्ही ऋतूत येथे आनंद घेता येते. पर्यटन महामंडळाने येथे निवासाची व्यवस्था केली आहे. टेहळणी मनोर्‍यांहून येथील वन्यजीव निरीक्षणाचाही आनंद घेता येईल.

पोहचायचे कसे?
विमान, रेल्वे व रस्ते मार्गाने येथे पोहचता येते. विमानाने पोहचायचे झाल्यास सव्वाशे किलोमीटरवर पुणे विमानतळ आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरहून (62 किमी) येथे पोहचता येते.

निसर्गरम्य फणसड अभयारण्यातून भटकंती


निसर्गाची विविधांगी रूपे याची देही याची डोळा अनुभवण्यातील आनंद अवर्णनीय असतो. कोकणातील फणसड वन्यजीव अभयारण्यात आपणांस याची प्रचीती येईल. विधात्याने सृष्टी सौंदर्याची लयलूट केलेल्या निसर्गासोबतच नयनरम्य समुद्रकिनारे हे फणसड अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. रायगड जिल्हयातील रोहा व मुरूड तालुक्यात सुमारे त्रेपन्न चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात हे अभयारण्य पसरले आहे.

जैवविविधतेने समृद्ध नटलेल्या समुद्रकिनारपट्टीलगतच्या जंगलाची विविध रूपे पाहायची ती येथेच. अभयारण्यात सुमारे एकवीस जातींच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. याशिवाय विविध वनस्पतींच्या सुमारे एक्क्यांनऊ प्रजातीं येथे आहेत. यावरून येथील जैविक विविधता लक्षात येईल. औषधी वनस्पतींचाही येथे खजिना आहे. विधात्याने नैसर्गिक जैवविविधतेची येथे लयलूट केली आहे.

सांबर, चित्ता, जंगली अस्वल या प्राण्यांचा येथील वनश्रीने नटलेल्या जंगलात मुक्त संचार आढळतो. येथील हिरव्यागार जंगलातून पक्षांच्या सुरेल सुरावटींच्या सानिध्यात मुक्त भटकंतीचा अनुभव अविस्मरणीय असतो. सुपेगावातून निसर्ग सहल नैसर्गिक सौंदर्याचा साक्षात्कार घडवते. निसर्गप्रेमींना माजगांव येथील निसर्ग केंद्रासही भेट देता येईल. अरबी समुद्राच्या आकाशास भिडणार्‍या लाटा झेलत स्थितप्रज्ञासारखा उभा असलेल्या जंजीर्‍यास भेट द्यायला विसरू नका. येथे थरार, रोमांच, साहस, अशा मिश्रित भावनांच्या अद्वितीय अनुभवाचे आपण धनी व्हाल.

अरबी समुद्राच्या आकाशास भिडणार्‍या लाटा झेलत स्थितप्रज्ञासारखा उभा असलेल्या जंजीर्‍यास भेट द्यायला विसरू नका. येथे थरार, रोमांच, साहस, अशा मिश्रित भावनांच्या अद्वितीय अनुभवाचे आपण धनी व्हाल. ऑक्टोबर ते एप्रिल ही येथे भेटीची उत्तम वेळ आहे. निर्सगाच्या सानिध्यात काही काळ घालवायचा असल्यास येथे निवासाची व्यवस्थाही आहे.

कसे पोहचायचे?
विमान, रस्ते व रेल्वेने येथे पोहचता येते. मुंबई हे जवळचे विमानतळ आहे. कोकण रेल्वेने जायचे झाल्यास रोहा हे येथून तीस किलोमीटर अंतरावर स्टेशन आहे. मुंबईहून येथील अंतर दीडशे तर अलिबागहून पन्नास किलोमीटरवर अभयारण्य आहे.