Sunday, May 2, 2010

येवा सिंधुदूर्गात स्वागत असा

क्षितिजापर्यंत परसलेल्या निळ्याशार समुद्राच्या सानिध्यात चंदेरी वाळूच्या किनार्‍यावर मुक्तपणे हिंडताना कोळी बांधवांचा जाळे फैलावण्याचा खटाटोप चाललेला... मासेमारीसाठी पारंपारिक बोटी समुद्रात ढकलल्या जाताहेत... मनाच्या कप्प्यात कोठेतरी जपलेल्या या चित्राची वास्तव अनुभूती आली तर? कोकणातील कुठल्याही किनाऱ्यावर हा अनुभव घेता येतो. पण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नितळ किनार्‍यांवरची त्याची अनुभूती काही वेगळीच. एकिकडे हिरवाईने नटलेल्या भूतलास कवेत घेणारा विशाल सह्याद्री तर दुसरीकडे निळ्याशार सौदर्याचा अविष्कार करणारा अरबी समुद्र. यादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश पर्यटकांना सृष्टीसौंदर्याचे अनुपम दर्शन घडवतो.

कोकणातील वेंगुर्ला हा तर स्वप्ना‍तला गाव. मंगेश पाडगावकरांचे जन्मगाव असलेल्या गावातील स्वप्नाळूपणा त्यांच्या कवितांत अवतरला नसता तरच नवल. वेगुर्ल्याला शुभ्र वाळूचा समुद्रकिनारा लाभला आहे. गावाभोवतालच्या टेकड्यांवर नारळ, काजू, आंब्याच्या बागा बहरल्या आहेत. एखाद्या चित्रात फिट्ट बसावे असे हे गाव. विलक्षण निसर्गसौंदर्याच्या कोंदणात वसले आहे. येथील रामेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच नारळाच्या झाडीत लपलेले सुंदर शहर म्हणजे मालवण. दगडी भूप्रदेशात सिंधुदुर्ग व पद्मगड हे दोन जलदुर्ग आहेत. त्यांना जोडणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवणने मिठागरे, चिनी मातीची भांडी व मालवणी खानपानासाठी ख्याती प्राप्त केली आहे.

लांबच-लांब पसरलेले समुद्रकिनारे, आपल्या उंचीने ढगांच्या उरात धडकी भरवणारी नारळाची झाडे, स्वच्छ सुर्यप्रकाशात तब्बल वीस फुटापर्यंयत समुद्राचा तळ दिसेल एवढे नितळ समुद्र सिंधुदुर्गाशिवाय इतरत्र पहायला मिळणे दुरापास्तच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ला तालुक्यात तारकर्ली, शिरोडा, वेळागर, निवाटी हे प्रदुषण व मानवी हस्तक्षेपापासून मुक्त समुद्रकिनारे आहेत. धकाधकीच्या शहरी आयुष्यातून हद्दपार झालेला निसर्ग आपल्याला येथे भेटतो. येथील निवांतपणा कुठल्याशा पवित्र शांततेचीही अनुभूती देतो. मन स्वच्छ झाल्यासारखे वाटते. सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत हातात कॅनव्हास, ब्रश घेवून मुक्तपणे फिरून विधात्याने निर्माण केलेले मनोहारी चित्र आपल्या मनावर उतरवण्याचा प्रयत्न करून बघायचा, तोही येथेच.

येथील समुद्रकिनार्‍यावरील सुर्यास्तावेळचे रंगाची उधळण करणारे दृश्य आयुष्यभर आपणांस आनंद देत राहील. नैसर्गिक सौदर्यासोबतच साहसी पर्यटक व इतिहासप्रेमीनाही सिंधुदूर्ग आवर्जून बोलावतो. सतराव्या शतकात बांधण्यात आलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्गही मालवणपासून जवळच आहे. शत्रूच्या उरात धडकी भरवणारा हा जलदुर्ग आजही अरबी समुद्राच्या लाटांचा सामना करत निकराने उभा आहे. वेंगुर्ल्याहून जवळच शिरोडा हे गाव आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकरांचे हे गाव. येथील समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारताना खेड्याभोवती पसरलेले मिठागरांचे दृश्य म्हणजे जणू पांढरा समुद्र समोर पसरल्यासारखे वाटते.

कोकणात पर्यटनास गेल्यास कोकणी पदार्थाची लज्जत अनुभवल्याशिवाय परतणार्‍याची गणना अरसिकातच होईल. तारकर्लीत खास कोकणी रेस्टॉरंट आहे. दोन-तीन दिवस भटकायचे झाल्यास महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने निवासाची व्यवस्थाही येथे केली आहे.

कसे पोहचाल : तारकर्लीचे मुंबईपासून अंतर आहे साडेपाचशे किलोमीटर. कोकण रेल्वेने येथे पोहचायचे झाल्यास कुडाळ स्टेशन येथून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. शिरोडा बीच वेंगुर्ल्याहून एकोणीस किलोमीटरवर आहे. कोल्हापूरमार्गेही जाता येते. कोल्हापूरहून तारकर्ली साधारणत: दीडशे किलोमीटरवर आहे. पुणे, कोल्हापूऱ, मुंबईहून मालवणसाठी बस आहेत. मालवणहून तार्कालीसाठी गाड्या आहेत. मालवण रत्नागिरीपासून दोनशे किलोमीटरवर आहे.

Friday, April 16, 2010

फ्रॉम द जर्नालिस्ट पर्सनल डायरी

टक.. टक.. टक.. दारावर वर्तमान पत्र टाकणारा मुलगा. सुरेशची साखर झोप अजूनही संपलेली नाही. झोपेतच... वैताग! पोरगं दारावरून हटायला तयार नाही. सुरेश नाराजीनेच बिछान्यातून उठून काय रे.. आ? पोरगं घाबरत, 'साहेब बील पायजे होत! ' सुरेशने पँटच्या खिशातून पैसे काढून बील चुकत केलं. सुरेशने पेपरवर नजर टाकली. पहिल्या पानावरील बातम्या वाचून झाल्यावर थेट शहर पानावर. स्वतःच्या बातमी सोबत लगेच इतर रिर्पोटर्सनी केलेल्या बातमीची तुलना. जनरल बातम्या झाल्यावर मग विशेष बातम्या. झकास!.. महानगरपालिकेतील सुरशने काढलेली जमीन घोटाळ्याची बातमी पहिल्या पानावर. तेही फक्त आपल्याच वर्तमानपत्रात.

ख़ास बातम्यांच्या बाबतीत शुरेशचा हातखंडा. शुरेशने अवघ्या तीन वर्षाच्या पत्रकारितेतील कारकीर्दीत आपले नेटवर्क तयार केले होते. इतर रिर्पोटर्सना बातमीची कुणकूण लागायच्या अगोदर सुरेश बातमी छापून तयार. वैताग झटकून आंघोळ उरकली. गाडीला जोरात किक मारली अन चाक गरगरा फिरायला लागली. ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्यनारायनाने भर सकाळी आग ओकायला सुरूवात केली होती. सुरेशला ऊन्हाचा मोठा वैताग. रिर्पोटरचे काम म्हटले की फिरणे आलेच. सुरेशच्या मते पावसाळ्यात एकदाचा रेनकोट घालता येणार परंतु ऊन्हाच काय? दुपट्टा गुंडाळला तर केसांचा वैताग. नाही गुंडाळला तर ऊन लागण्याची भीती.

विचारचक्र सुरू असतानाच गंजूच्या टपरीसमोर गाडीचे कचकन ब्रेक लागून चाक फिरायची थांबली. गजू पानावर चुना लावता-लावता नमस्कार सुरेश साहेब! सुरेश, ' नमस्कार.. आजच पान रंगायला पाहिजे'. रंगणार की साहेब. बातमी लय झकास आलीय म्हटलं. गजू व सुरेश यांच्यात थोडावेळ त्यांच्या सांकेतिक भाषेत बोलचाल झाली अन सरेशने गाडीची किक मारताच चाके फिरायला लागली. गाडीची चाकं पार्किंगमध्ये थांबली अन सुरेशने टेलिफोनचा ताबा घेतला. टेलिफोनची रिंग घरघरू लागली. कुठे, काय, कस, केव्हा, का? उरकले. चमत्कार, नमस्कार झाले. मग साहेब, आज यायचं काय? काय रामभाऊ साहेब काय म्हणतायत! इत्यादी संपलंय. याला सुरेश राउंड म्हणतोय. सतर्क पत्रकारिता करायची झाल्यास किमान दोनदा राउंड घ्यायलाच पाहिजे, हा सुरेशचा दंडक. ऋतू बदलले, वर्ष गेलीत पण सुरेशची पत्रकारितेची बाराखडी बदलणार नाही.

पाचदहा फिडबॅकचे कॉल घेऊन झाले. बातमी बद्दलच्या प्रतिक्रियाही आटोपल्या. बरेच ऊन-पावसाळे निघून गेल्याने सुरेशला याचे रट्टे-घट्टे पडले होते. संपादक साहेबासोबतची बैठक आटोपली. तोपर्यंत जेवणाचा डबा आला. न्याहारी उरकली. सुरेशने दैनंदिन डायरीतील नोंदी डोळ्याखालून घातल्या. काही टिपणं काढली. गाडीला किक मारताच चाके फिरायला लागली. महानगरपालिकेचा पार्किंगमध्ये चाके थांबली. पत्रकार दालनात पोहचेपर्यंत शंभरेक नमस्कार चमत्कार झाले. महापौर, आयुक्तांची भेट- गाठ झाली. विरोधीपक्ष नेतेही भेटले. इतर पत्रकार मंडळीशी पत्रकार दालनात रोजच्या प्रमाणे मुक्त फटकेबाजी झाली.
सगळ्यांना बीट करून शहरातील प्रमुख घोटाळ्याची बातमी छापल्याने इंप्रेशन एकदम टाईट. परंतु सुरेश माणूस एकदम दिलदार मनाचा. बोलायला मनमोकळा. दोस्तांचा दोस्त. अभिजितने मधातच पिलू सोडलं, 'मग सुरेश आज कोठे बसायचं? सुरेश वैतागला. सालं बसनं, अन फालतू चकाट्या मारत ढोसणं, याचा त्याला आता वैताग यायला लागला होता.

सुरूवातीला सुरेशलाही मजा यायची. सुरेशचे आता राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या मातब्बर लोकांमध्ये बसनं-उठणं होतं. तीन वर्षाच्या अथक प्रयत्नातून त्याने स्वत:ला पत्रकारितेत प्रस्थापित केलं होत. नावं कमावलं होत. शालेय जीवनापासून चालू ठेवलेल्या वाचनात त्याने आजही खंड पडू दिला नव्हता. त्यामुळे त्याला चांगली बैठक प्राप्त झाली होती.

महानगरपालिकेची विधायक कामे, भ्रष्टाचार व राजकीय गटबाजीचे विश्लेषणात्मक व शोध पत्रकारितेचा पाया असणारे वार्ताकन तो करायचाच. यासोबतच सांस्कृतिक प्रांतातील सर्जनशीलतेला वाव असणार लेखनही तो करायचा. सुरेश कलात्मक अभिरूची जोपासणारा माणूस. संगीत, नाटक, साहित्य यात त्यास विशेष रूची. कलात्मक व दर्जेदार कलाकृतींचा त्याच्या संग्रहात समावेश नाही असं कधी झालं नाही. चौफेर वाचन, कलात्मकता जोपासणारा स्वभाव व आडव्या उभ्या क्षेत्रात असणारा त्याचा परिचय, मैत्री यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वात परिपक्वता आली होती. आपणं मिळविलेली पत, प्रतिष्ठा याला गालबोट लागू नये, यासाठी त्याने जपायला सुरूवात केली होती. अनंतानेर, काय सुरेश कसला विचार करतोस यार? असे म्हणत खांद्यावर हात ठेवल्यावर त्याची विचारचक्र थांबली. झपाझप पायऱ्या उतरून सुरेश पार्किंगमध्ये आला अन गाडीला किक बसली. चाके गरगरा फिरायला लागली. ऑफिसमध्ये येऊन त्याने कॉपी टाईप केल्या. बातमी सोडून थेट रूमवर.

नुकत्याच गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेल्या होम थियटरवर त्याने मस्त जगजीत सिंग लावला. गझलचे सुरेल, मंद स्वर वातावरणात पसरल्यावर स्लिपवेलच्या गादीवर पडून तो कॉलेजच्या आठवणीत रंगला. दररोजच्या वैतागापासून आज त्याला निवांत क्षण मिळाले होते. तीन वर्षाअगोदर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व पत्राकरिता विभागात आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात महाराष्ट्रातील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांच्या संपादकांसोबत संवाद साधण्याची संधी त्याला मिळाली होती. विद्यार्थ्यामधून सुरेशने महाराष्ट्रातील राजकीय व सांस्कृतिक चळवळीवर केलेल्या विश्लेषणात्मक व तार्किक कसोटीवर टिकणाऱ्या भाषणाने झालेला कौतुकाचा वर्षाव त्यास आजही आठवतो. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात, 'सुरेश ग्रेट, एक्सलंट! हे विभाग प्रमुख व संपादकांचे शब्द आजही त्याला प्रेरणा देतात.

कविता, सुधीर, प्रवीण, केतकी यांच्या घोळक्यात रमेशच्या कँटिनवर चहाचे फुरके मारताना गरम, चुरचुरीत कांदा भजी खाताना केतकीने त्याला सार्वजनिकरीत्या प्रपोज केले होते. 'आय लव्ह यू अँड वूड लाइक टू बी विथ टू फॉरएव्हर! या शब्दांनी सुरेश एकदम चाट पडला होता. मैत्री वगैरे ठीक पण प्रेम वगैरे म्हणजे वैतागच, हे समीकरण त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेलं होत. सुरेश, 'सॉरी केतकी, अँट धीझ क्रुशीयल स्टेज आय हॅव नो टाइम फॉर लव्ह. माय फर्स्ट प्रायऑरिटी इज जर्नालिझम! केतकी, 'सुरेश आय नो दॅट यूर आर टू पॅशनेट अबाउट जर्नालीझम. बट डू नॉट कंफ्यूज प्रोफेशन विथ पर्सनल लाईफ अँड एमोशन्स. वैताग. सुरेश वैतागला. आता प्रवीण, कविता व सुधीरही चालू होणार व यांना कनव्हींस करणे शक्य नाही हे त्याला माहिती होते.

सुरेश सरळ पार्किंगमध्ये, अन गाडीस जोरात किक. चाकांसोबतच विचार चक्रही गरगरा फिरायला लागली. वेताळ टेकडीच्या पायथ्याही ब्रेक लागताच चाके थांबली. टेकडीवर हवसे, नवसे, गवसे सर्वच फिरायला येत असतात. प्रत्येकाच्या जागाही ठरलेल्या. सुरेश सर्व वैताग पार करून सर्वात उंच भागावर जाऊन बसला. संध्याकाळ झाली होती. आल्हाददायक हवा अंगाला स्पर्शून जात होती. संपूर्ण शहराचे मनमोहक दर्शन येथून व्हायचे. सगळीकडे दिवे लागल्याने शहर प्रकाशात न्हाऊन निघाले होते. इतर वेळेस प्रचंड ट्रॅफिक, आवाज व पोलुशनमुळे वैताग देणारे रस्ते शांत, शिस्तबद्ध भासत होते. मिणमिणते दिवे घेऊन गाड्या ये जा करीत होत्या. वैताग घालविण्यासाठी सुरेशचे हे फेमस ठिकाण होते. येथे कोणीही फुकटचा सल्ला देणार नाही किंवा शहाणपण शिकविणारं नाही. डिस्टर्ब करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Thursday, April 1, 2010

इट्स स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहा!

इंडियन प्रिमियर लिगचे सामने बघताना २० षटकांचा खेळ पूर्ण होण्याअगोदरच 'स्ट्रॅटेजिक टाइमआउट' मध्ये, फलंदाज बाद झाल्याबरोबर किंवा कोणतीही संधी मिळताक्षणी होणाऱ्या जाहिरातींच्या भडिमाराने आपण त्रस्त झाला असणार. अस्सल क्रिकेट बहाद्दर, शौकीन आणि एखाद्या संघाचे समर्थक असणाऱ्या प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे काम मधातच घुसडण्यात आलेल्या या जाहिराती करत असतात.

क्रिकेटच्या व्यावसायिकरणासोबतच खेळास एंटरटेनमेंट इव्हेंट बनवण्याची कास आयोजकांनी हाती घेतली आहे हे जाणत्या चाहत्यांच्या लक्षात आलेच असणार. चार तास खच्चून मनोरंजनासाठी मैदानावरील तडाखेबंद फटकेबाजीसोबतच, प्रेक्षकांच्या दिमतीस चीअरलीडर्स आहेतच. बहारदार फटक्यांनी चाहत्यांना खिळवून ठेवण्याची जबाबदारी क्रिकेटपटूंना देण्यात आली आहे. तर प्रेक्षकांना लयबद्ध हालचालींनी घायाळ करण्याचे काम हे चीअरलीडर्सचे.


महामहीम ललित मोदींच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या या लीग स्पर्धेने मिळकतीची कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन भाबड्या चाहत्यांना अगोदरच अवाक केले आहेत. आयोजक, प्रायोजक, संघमालक, खेळाडू, ब्रॉडकास्टर सगळ्यांना खोऱ्याने पैसा ओढण्याचा एककलमी कार्यक्रम ठरवून देण्यात आलेला आहे. मात्र हे सामने बघण्यासाठी टीव्हीसमोर डोळे फोडणारा किंवा हौसेने मैदानावर जाऊन सामने बघणारा प्रेक्षक यापासून वंचितच, त्याने फक्त खिसा हलका करायचा. हा अजबच न्याय झाला राव नाही का?


२०-२० षटकांच्या सामन्यादरम्यान चौफेर फटकेबाजीच्या आतिषबाजीतच मध्येच डोकावणाऱ्या जाहिरातीही रंग उधळत असतात. ब्रेक मध्ये जाहिरातींचे डोकावणे हक्काचेच झाले आहे, मात्र गडी बाद झाला की... चेंडू हरवला की... कुणास दुखापत झाली की... कधीही घुसडणं जरा अतीच झाली. मग क्रिकेट सामना आणि एखाद्या चॅनेलवरचा हिट चित्रपट पाहण्यात फरक काय? असा प्रश्न आपणांस पडला असणारच. क्रिकेटचे एंटरटेनमेंट इव्हेंटमध्ये झालेल्या रूपांतरातच त्याचे गमक आहे.

'अतुल्य' अभिनेता

मराठी नाट्यसृष्टीतून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारया अतुल कुलकर्णी या गुणी व सर्जनशील अभिनेत्याने अगदी थोड्या कालावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला आहे. हे राम, पेज थ्री, चांदनी बार, दम या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षक व समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

तब्बल दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून अभिनयाची पावती मिळवली आहे. अभ्यासू अभिनेता अशी ओळख असलेल्या अतुलला आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका करायला आवडतात. त्यामुळे चाकोरीबाहेरचा अभिनेता अशी त्याची ओळख आहे. अतुलचा जन्म बेळगावचा. त्याचे शिक्षण झाले ते सोलापूरात.

शिक्षणात अतुलची गती साधारणच होती. म्हणजे सांगायचं झालंच तर बारावीला तो दोनदा परीक्षेला बसला आणि त्यानंतर अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाची परीक्षा त्याला तीनदा द्यावी लागली. मग त्यानंतर त्याने आपल्या अंतर्मनाला साद देत आपला कौल असलेल्या कला क्षेत्रात शिक्षण घेण्याचे नक्की केले.
त्यासाठी पुन्हा सोलापूरात आला.

इंग्रजी साहित्य घेऊन त्याने पदवी घेतली. इंग्रजी साह्त्यि वाचनाने त्यांच्या सृजनाला, अभिव्यक्तीस वाट मिळाली अन जाणीवा समृद्ध होत गेल्या. याच काळात तो नाटकांशीही जोडला गेला. सोलापूरच्या नाट्य आराधना या ग्रूपबरोबर काम करायला सुरवात केली. सुरवातीला दोन वर्षे तर पडद्यामागचा कलाकार होता.

नंतर त्याला स्टेजवर येण्याची संधी मिळाली आणि नंतर मिळतच राहिली. आता त्याने या क्षेत्राचा गंभीरपणे विचार सुरू केला आणि त्यासाठी शास्त्रसुद्ध शिक्षण घेण्याची आवश्यकता भासू लागली. मग त्याने दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात' प्रवेश घेतला. तेथे त्याला मार्गदर्शन मिळाले ते नसरूद्दीन शहा, रतन थिय्यम आदी मान्यवरांचे. येथेच त्याच्या गुणवत्तेला पैलू पडले. त्याच्यातला कलाकार बाहेर आला.

एनएसडीतून बाहेर पडल्यानंतर त्याने पहिले व्यावसायिक नाटक केले ते देवदास व गांधींजींमधील संघर्ष मांडणारे गांधी विरूद्ध गांधी. यात त्याने गांधीजींची भूमिका केली. अतुलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हे नाटक हिंदी व गुजरातीतही झाले. तेथेही ते कौतुकास पात्र ठरले. त्याच्या भूमिकेला गुजरात सरकारचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर एडससंदर्भात माहिती देणारे 'क्रॉसरोडस तसेच मृच्छकटिकम, रतन थिय्यम दिग्दर्शित 'थंबानालू, गिरीश कर्नाड लिखित 'अंजु मलिगे' ही काही नाटके केली. ही सर्व नाटके वेगळ्या प्रकारची आहेत.

सद्या अतुल गुलजार यांच्या कवितांवर आधारीत 'खराशे' चे प्रयोग करतो आहे. मराठी चित्रपटांमधल्या त्याच्या भूमिकाही वेगळ्या आहेत. 'देवराई' चित्रपटात त्यांनी साकारलेली स्किझोफ्रेनिक पात्राची भूमिका दाद मिळवून गेली. 'चकवा, दहावी फ, वास्तुपूरष, नटरंग हे त्याचे अन्य काही चित्रपट. अतुल खर्‍या अर्थाने ओळखला जाऊ लागला तो हिंदी चित्रपटांमुळे.

कमल हासनच्या 'हे राम' मधील अभ्यंकर या पात्रातील अभिनयानेच त्याने चुणूक दाखवली होती. त्याचे फळही त्याला सहाय्यक अभिनेत्यासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने मिळाले. त्यानंतर मग 'चांदनी बार, पेज थ्री, खाकी, ८८ अँटॉप हिल, सत्ता, दम' या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचेही कौतुक झाले.

शिवाय त्याने काही इतर भाषक म्हणजे इंग्रजी, तेलगू, कन्नड चित्रपटातही काम केले आहे. त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कलाकार हा नेहमी स्वतच्या अभिव्यक्तीबाबत असमाधानी असतो. पूर्णत्वासाठी त्याचा स्वतःशीच संवाद सुरू असतो. आपण रंगविलेल्या पात्रांचा अभ्यास करीत कच्चे दुवे हेरून त्याला पूर्णत्व देतानाच कलेच्या अभिव्यक्तीबाबत विविध प्रयोग करीत असतो.

अतुलला हे सारे तंतोतंग लागू पडते. त्यासाठी त्यांनी रंगभूमीशी आपले नाते आजही कायम ठेवले आहे. अतुल केवळ अभिनेता नाही, तर त्याच्यात एक संवेदनक्षम माणूसही दडला आहे. म्हणून नर्मदा बचाव आंदोलनासंदर्भात विस्थापितांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे यासाठी मेधा पाटकरांनी दिल्लीत आंदोलन केले होते. त्यावेळी तेथेच असणाऱ्या आमीर खान व अतुल कुलकर्णी या कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला होता व त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्यानंतरही तो आपल्या भूमिकेशी ठाम होता.

Sunday, March 28, 2010

बिहारींचा राजकीय वापर अपरिहार्य- रूडी

राजीव प्रताप रूडी हे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व सध्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. बिहारचे प्रतिनिधीत्व करणारे रूडी एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. ते मगध विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापकही होते. मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी युपी व बिहारींविरोधात आंदोलन छेडले आहे. यासंदर्भात रूडी यांच्याशी मनोज पोलादे यांनी केलेली बातचीत.

''महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयाविरुद्धचे आंदोलन थांबवावे. त्यांचे आंदोलन हे व्यक्तीच्या घटनादत्त मूलभूत अधिकारांचा संकोच करणारे आहे. शिवाय घटनेच्या चौकटीस छेद देणारे आहे. यासोबतच बिहारमध्ये राजकारण करणार्या लालू प्रसादांसारख्या नेत्यांनी बेताल वक्तव्ये करून राज यांना चिथावणी देण्याचे प्रकार थांबवावेत''. कारण यांच्या राजकारणात जीव जातो तो मुंबईत काम करणार्या सामान्य श्रमिकांचा, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी वेबदुनियाशी बोलताना व्यक्त केले. त्याचवेळी मुंबईतील युपी व बिहारींचा राजकीय वापर अपरिहार्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.


स्थानिकांच्या न्यूनगंडावर प्रादेशिक पक्षांचे राजकारण

स्थानिकांच्या न्यूनगंडावर प्रादेशिक पक्षांचे राजकारणबिहार व उत्तर प्रदेशात लोकसंख्येच्या प्रमाणात विकास झालेला नाही. विकसित क्षेत्रांकडे रोजगाराच्या शोधात लोंढ्यांचे स्थलांतर ही स्वाभाविक प्रक्रिया आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, की कोणत्याही ठिकाणी बाहेच्यांचे प्रमाण मर्यादेबाहेर झाले, की स्थानिकांमध्ये न्यूनगंड, धास्ती निर्माण होते. असुरक्षिततेची भावना सर्वव्याप्त व्हायला लागते. अस्मितेचे राजकारण करणारे राजकीय पक्ष नेमके स्थानिकांच्या या भावनेस हात घालून परप्रांतीयांपासून तुम्हांस धोका आहे, असे सांगून यातून तुमचे तारणहार आम्हीच असे ठसवून राजकारण करतात. मुंबईत बिहारी व उत्तरप्रदेशातील स्थलांतरीतांची संख्या मोठी असल्याने साहजिक असल्या भाषिक, अस्मितेच्या आंदोलनाचे ते लक्ष्य ठरतात.


स्वतःचे महत्त्व वाढविण्यावर प्रादेशिक पक्षांचा भर

स्वतःचे महत्त्व वाढविण्यावर प्रादेशिक पक्षांचा भररूडींच्या मते प्रादेशिक पक्षांना मर्यादा आहेत. ते म्हणतात, की देशात भारतीय जनता पक्ष व डावे पक्ष हे दोनच राष्ट्रीय पक्ष स्ट्रक्चर्ड पक्ष आहेत. यामध्ये सामान्य कार्यकर्ताही सर्वोच्च पदापर्यंत पोहचू शकतो. इतर राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष हे व्यक्तीआधारीत असून जात, गट भाषा, अस्मिता हे त्यांचे आधार आहेत. यामुळे राज्याचा सर्वांगीण विकासाऐवजी व्यक्तीगत संस्थाने वाढवण्यातच त्यांची शक्ती खर्ची पडते.


बिहारच्या अविकासास कॉंग्रेस, लालू जबाबदार

बिहारच्या अविकासास कॉंग्रेस, लालू जबाबदारपरप्रांतात लोंढे जाण्यास बिहारमधील परिस्थिती कारणीभूत आहे. मग बिहारचा विकास का झाला नाही, असे विचारले असता, यासाठी त्यांनी कॉंग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांना जबाबदार धरले. ‘’बिहारच्या राजकारणावर दृष्टिक्षेप टाकल्यास कॉंग्रेस व राष्ट्रीय जनता दलाकडेच सत्तेची धुरा राहिली आहे. कॉंग्रेस तर विकासाबाबत निष्क्रिय पक्ष म्हणून ख्यातनामच आहे. यानंतर लालूप्रसाद यादवांच्या पंधरा वर्षाच्या राजवटीने बिहारला रसातळाला नेऊन ठेवले. बिहारमधील बेकारी व अविकासासाठी सर्वस्वी त्यांनाच जबाबदार धरता येईल, असे त्यांनी ठासून सांगितले. भाजपचा पाठींबा असलेल्या नितीश कुमार सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळातही बिहारमध्ये फारसे भव्यदिव्य घडले नसल्याकडे बोट दाखविले असता, विकासाची प्रक्रिया ही काही जादूची कांडी नाही की ती फिरवली आणि विकास झाला अशा शब्दांत उत्तर दिले.


बिहारमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता

बिहारमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता पण तरीही बिहारच्या विकासासाठी ठोस प्रयत्न का होताना दिसत नाही, या विषयावर त्यांना बोलते केले असता, ते म्हणाले, की इंडस्ट्री येण्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा भक्कम असाव्या लागतात. रस्त्यांचे जाळे असायला पाहिजे. राजकीय, सामाजिक परिस्थितीही अनुकूल असावी लागते. राज्यात निर्भय व मुक्त वातावरणासोबतच उद्योगांना लागणाऱ्या प्राथमिक सुविधा पुरवल्या तरच इंडस्ट्री विकसित होते. बिहारमध्ये एवढ्यातल्या राजकीय इतिहासावर नजर टाकल्यास नेमके उलट चित्र आहे. त्यातच स्वतंत्र झारखंडच्या निर्मितीनंतर नैसर्गिक खनिज संपत्तीही गेल्याने बिहार पंगू झाल्याचे विश्लेषण ते करतात.


विकासामुळेच महाराष्ट्रात स्थलांतरीतांचे लोंढे

विकासामुळेच महाराष्ट्रात स्थलांतरीतांचे लोंढेमर्यादेबाहेरच्या स्थलांतरीतांच्या संख्येमुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांवर कमालीचा ताण पडत आहे याकडे लक्ष वेधले असता, महाराष्ट्र मुंबईचा सर्वांगीण विकास झाला असून ते लोंढे पेलण्यास सक्षम आहे. शेवटी रोजगार व विकासाची संधी मिळेल तेथे स्थलांतर होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी महाराष्ट्रातील एकंदरीत विकासात स्थलांतरितांचाही हातभार लागत अाहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मात्र, त्याचवेळी मुंबईसारखे शहर देशातील बहुतांश युवकांना रोजगार देत असेल, स्थलांतरीतांच्या लोंढ्यांना सामावून घेत असेल तर केंद्राने मुंबईस विशेष अनुदान द्यायला हवे काय याबाबत प्रश्न विचारला असता ‘केंद्राने यासंदर्भात निर्णय घ्यायला हवा, असे सांगून उत्तर द्यायचे टाळले.


युपी, बिहारींचा राजकीय वापर अपरिहार्य

युपी, बिहारींचा राजकीय वापर अपरिहार्यमहाराष्ट्रात आपले राजकारण वाढविण्यासाठी स्थलांतरीत युपी, बिहारींचा राजकीय ‘बेस’ म्हणून वापर करणे योग्य आहे काय? या प्रश्नास बगल देत ते म्हणाले, की मुंबईत एखाद्या भागात एखादा उमेदवार निवडून येण्याजोगे त्यांचे संख्याबळ निर्माण झाल्यास त्यांच्यातून राजकीय नेतृत्व उदयास येणे स्वाभाविक आहे. राजकीय व सामाजिक संरक्षण मिळावे, हिताची जपणूक व्हावी यासाठी स्थलांतरित लोंढ्यांचा राजकीय बेस म्हणून वापर टाळता येणे कठीण आहे. सर्वच लोकशाही देशात हीच प्रक्रिया आहे. कारण घटनेनुसार देशभरात कोठेही मुक्त संचार करण्याचा, वास्तव्याचा व रोजगार करण्याचा, व संघटनेचा मूलभूत हक्कच आहे. यास कोणी हरकत घेऊ शकत नाही. आणि ते योग्यही नाही, अशी भूमिका ते मांडतात.

Friday, March 26, 2010

सकाळचा चहा

पहाटेच कामास सुरूवात केली. बायको झोपेत असताना कार्यालयासाठी निघणे फारसं रूचत नाही, मात्र उपाय नाही. पहाटेची वेळ तशी प्रसन्न, ताजीतवानी. सगळीकडे नितांत शांतता, या पहाटेच्या कॅनव्हासवर सुर आणि रंग उमटणार ते फक्त पक्षांच्या किलबिलाटाचे आणि सुर्योदयाचे.
सृष्टित पहाटेच्या रंगोत्सवास सुरूवात होतेसरशी स्वत:स कामात गढवून घेणे, यातही एक आनंद असतो. लहानपणापासून वडिलांनी वळण लावलल्यामुळे माझ्या दिवसांस पहाटेपासूनच सुरूवात होते. रात्री लवकर झोपी जाऊन पहाटेच्या प्रहरी निद्राराणीच्या कुशीतून बाहेर पडून सुर्योदयाची किरणे बाहूत घेणे मनास सुखद अनुभव देवून जाते.

निद्राराणीची याबाबत विशेष तक्रार नसते, कारण माझ्या लहानपणापासून तिच्या अंगवळणी पडले आहे. मात्र माझ्या राणीसाठी हे असहनीय असते. रात्रीतली बेधुंदी अजूनही डोळ्यात तरळत असलेल्या राणीस अशावेळी मी हवा असतो. सकाळच्या सारखझोपेतली साखर माझे तिच्यासोबत असण्यानेच घातली जात असते. नाहीतर तिला सकाळचा चहा कडू घातल्यासारखा जाणवतो. मात्र सकाळी अनपेक्षितपणे तिच्यासोबत चहा घेण्याचा योग जुळवून आणून मी तिला सरप्राईस नक्कीच देणार!


राणीस सरप्राईस खूप आवडते. ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे तिच्यासमोर स्वारींच हजर होणे तिला सुखावून जाते. चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहतो आणि डोळ्यात एक चमक, लकाकी. तिला किती आनंद होत असेल हे मोजता येणार नाही, मात्र तिच्या प्रेमवर्षावातून होणार्‍या अनुभूतीतून मी कयास बांधत असतो.