Sunday, September 4, 2011

अनिल अवचट


डॉ. अनिल अवचट वास्तववादी लेखक आहेत. वातानुकूलित खोलीत बसून कॉफीचे भुरके मारत विश्लेषण करणार्‍या किवा कल्पनांचे महाल उभारणार्‍या लेखकांपेक्षा डॉ. अवचट यांची जातकुळी जरा वेगळी आहे. कोणतीही समस्या किवा प्रश्नावर लिहिण्या अगोदर ते ती परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवतात.

त्यांच्या लेखनाची शैली व पद्धतच तशी आहे. थोडक्यात रिपोर्ताज पद्धतीचे लेखन त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले. त्यांच्या वेगळ्या नि वास्तववादी शैलीमुळे लोकांना ते आवडलेही. कृतीवर विश्वास ठेवणारया अवचटांचे लेखन अनुभव व कृतीतून उमटते.

त्यामूळेच वाचक जेव्हा अवचटांना वाचतो तो त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. ते वाचकांना वस्तुनिष्ठ व वास्तव अनुभव देतात. अवचटांची लेखनशैली साधी, सरळ व अनलंकृत आहे. अवचटांचा पिंड आहे कार्यकर्त्याचा. समाजसेवकाचा. त्यांनी प्रश्नांना, समस्यांना वरवरून बघितले नाही, तर समस्येच्या थेट मुळाशी पोहचण्याचा त्यांचा आग्रह असतो. डॉ. अवचट यांनी पुण्यात. बी. जे वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकशास्त्राची पदवी घेतली.

वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही त्यांच्या चर्चा चालायच्या त्या सामाजिक क्रांती, सुधारणा, जागृती, विकास या विषयांवरच. डॉ अवचटांच्या बी. जे. मधील मित्रांमध्ये डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ जब्बार पटेल यांचा समावेश होता. कलाक्षेत्रात रस असणारे हे त्रिकूट संपूर्ण महाविद्यालयात 'फेमस' होतं. महाविद्यालयातील स्नेहसंमेलने, महोत्सव, आंदोलने हे यांचे प्रांत. तिघांनीही वैद्यकीय पेशा सोडून कला, समाजसेवा, व राजकीय क्षेत्रांत स्वतःला वाहून घेतले.

डॉ. अवचट यांनी डॉक्टरकी सोडून संपूर्ण वेळ समाजसेवा व लेखनाला द्यायचा निर्णय घेतला. या काळात त्यांच्या पत्नीची त्यांना खंबीर साथ लाभली. मादक द्रव्याच्या आहारी गलेले तरूण, आहारी जाण्याची कारणे व आहारी गेल्यानंतर कौटूंबिक, सामाजिक, आर्थिक पातळीवर उभी राहणारी आव्हाने यांचा अभ्यास केला. यातून आलेल्या अस्वस्थतेतून 'गर्द' हे पुस्तक निर्माण झाले. मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या तरूणाईला वाचविण्यासाठी काही तरी करायला पाहिजे या अस्वस्थतेतून 'मुक्तांगण' ही संस्था उभी राहिली.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी मुक्तांगणच्या उभारणीत प्रारंभी हातभार लावला. कोंडमारा, कार्यरत, माणसे, जगण्यातील काही, धागे उभे आडवे ही डॉ. अवचटांची काही पुस्तके. डॉ अवचटांनी 'स्वतविषयी' हे आत्मपर पुस्तक लिहिले आहे.

स्वतःविषयी हा स्वतच्याच उभ्या आडव्या आयुष्याचा वस्तूनिष्ठ वृतांत आहे. डॉ अवचट यांच्यात कलावंत खच्चून भरला आहे. डॉ अवचट उत्तम रेखाटन, चित्रकला, शिल्पकला यासोबतच ओरीगामी कलेत त्यांनी प्राविण्य मिळविलेले आहे. चित्रकला, ओरीगामी हे त्यांचे फावल्या वेळतील छंद आहेत. या छंदांबद्दल त्यांनी 'छंदाविषयी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.

No comments:

Post a Comment